पालखी मुक्कामासाठी शारदा प्रांगणात उभारणार भव्य शामियाना; अप्पर जिल्हाधिकार्‍यांकडून आढावा | पुढारी

पालखी मुक्कामासाठी शारदा प्रांगणात उभारणार भव्य शामियाना; अप्पर जिल्हाधिकार्‍यांकडून आढावा

बारामती : पुढारी वृत्तसेवा

बारामती शहरातील शारदा प्रांगणात श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम असतो. या ठिकाणासह पालखी मार्गाची अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी पाहणी केली. बारामतीतील विविध शासकीय विभागांचे अधिकारी या वेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते.

तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी अनिल बागल, मुख्याधिकारी महेश रोकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अनिल ढेपे, महावितरणचे अभियंता धनंजय गावडे, पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, महेश ढवाण, सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे आदी या वेळी उपस्थित होते. पालखी महामार्गाच्या अधिकार्‍यांनाही या वेळी बोलाविण्यात आले होते.

सांगली : जिल्ह्याचा बारावीचा निकाल 93.91 टक्के

रोटी घाटापासून सोहळा पुढे येत असताना काही ठिकाणी सेवारस्त्याची गरज आहे, त्यासंबंधी चर्चा झाली. बारामतीत शारदा प्रांगणात पालखी सोहळा 28 जून रोजी मुक्कामी असेल. त्यानुषंगाने सोहळ्यासाठी आवश्यक तयारीची देशमुख यांनी माहिती घेतली. शारदा प्रांगणात नगरपरिषदेकडून पालखी सोहळा मुक्कामासाठी भव्य शामियाना उभा केला जाणार आहे.

या ठिकाणी त्यासाठी आवश्यक ते काम सध्या सुरू करण्यात आले आहे. याबाबत तहसीलदार विजय पाटील म्हणाले की, पालखी सोहळा दरवर्षीप्रमाणे शारदा प्रांगणातच मुक्कामी असेल. पाटस रस्त्यावरील देशमुख चौकातून जुन्या मार्गानेच सोहळा शारदा प्रांगणात येईल. परंतु, गेली दोन वर्षे कोरोना असल्याने यंदा सोहळ्याला अधिक गर्दी होईल, असे बोलले जात आहे.

तापमानवाढ आणि अन्‍न संकट

त्यामुळे सोहळा विश्वस्तांना बारामतीत देशमुख चौक, सातव चौक, आगरवाल विद्यालय ते सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालय हा मार्ग दाखविण्यात आला आहे. संभाव्य गर्दी टाळण्यासाठी हा मार्ग वापरात येऊ शकेल, असे सुचविण्यात आले आहे. परंतु, यंदा जुनाच मार्ग वापरला जाईल.

वारकर्‍यांच्या अंघोळीसाठी उपाययोजना सुरू

शहरातून वाहत असलेल्या निरा डावा कालव्यात सिमेंट अस्तरीकरण करण्यात आले आहे. कालव्यामध्ये अनेक वारकरी अंघोळ, कपडे धुण्यासाठी उतरत असतात. अस्तरीकरणामुळे बारामतीत ती सोय उरलेली नाही. त्याबाबत काय उपाययोजना करता येतील, याबाबत देशमुख यांनी अधिकार्‍यांना सूचना केल्या.

 

Back to top button