सांगली : जिल्ह्याचा बारावीचा निकाल 93.91 टक्के | पुढारी

सांगली : जिल्ह्याचा बारावीचा निकाल 93.91 टक्के

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाचा बारावीचा जिल्ह्याचा निकाल 93.91 टक्के लागला. यावर्षीही मुलींनी बाजी मारली आहे. विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक 98.58 टक्के आहे; मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा 5.7 टक्क्यांनी निकालात घट झाली आहे. जिल्ह्यातील 115 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. कोल्हापूर विभागात जिल्ह्याचा तिसरा क्रमांक आहे.

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा निकाल बुधवारी बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन जाहीर करण्यात आला. बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आपला निकाल मोबाईलवर पाहिला. दुपारी दोन वाजपर्यंत निकालाचे सर्व चित्र स्पष्ट झाले होते. पास झालेल्या विद्यार्थ्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.

जिल्ह्यात एकूण 272 कनिष्ठ महाविद्यालये आहेत. या विद्यालयातील जिल्ह्यात 33 हजार 201 विद्यार्थ्यांनी 68 परीक्षा केंद्रांतून परीक्षा दिली. त्यापैकी 31 हजार 180 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 2 हजार 21 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

विज्ञान शाखा आघाडीवर

विज्ञान शाखेचा निकाल 98.58 टक्के लागला आहे. या शाखेच्या 16 हजार 640 विद्यार्थीपैकी 16 हजार 405 जण पास झाले आहेत. 235 विद्यार्थी नापास झाले. कला शाखेत 9 हजार 526 विद्यार्थ्यांपैकी 8 हजार 378 जण उत्तीर्ण झाले. तर 1 हजार 148 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. या शाखेचा निकाल 87.94 टक्के लागला. वाणिज्य शाखेच्या 5 हजार 421 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यातील 522 जण नापास झाल्याने 90.37 टक्के निकाल लागला. 4 हजार 899 विद्यार्थी पास झाले. याबरोबरच व्यावसायिक शाखेच्या 1 हजार 606 पैकी 1 हजार 491 विद्यार्थी पास झाले. 115 जण नापास झाले आहेत. या शाखेचा निकाल 92.83 टक्के लागला आहे.

निकालात मुलींचा झेंडा

दरवर्षी प्रमाणे यंदाही पास होण्याबरोबर चांगली टक्केवारी मिळविण्यास मुलांपेक्षा मुलींनी बाजी मारली आहे. बारावी परीक्षेला जिल्ह्यातून 18 हजार 91 मुलांपैकी 16 हजार 597 मुले उत्तीर्ण झाली आहेत. मुलांच्या निकालाची टक्केवारी 91.74 टक्के आहे. 2021 मध्ये हे प्रमाण 99.47 टक्के होते. तसेच 15 हजार 110 मुलींपैकी 14 हजार 583 मुली उत्तीर्ण झाल्या. मुलींचा निकाल 96.51 टक्के लागला आहे. 2021 मध्ये हे प्रमाण 99.77 टक्के होते.
रिपीटरचा निकाल 40.71 टक्के
जिल्ह्यात 646 विद्यार्थी रिपीटर होते. यातील263 जण पास झाले आहेत. 383 विद्यार्थी नापास झाले आहेत. निकालाची ही टक्केवारी 40.71आहे.
गुणपत्रिका मिळणार 17 रोजी
बोर्डाच्या संकेतस्थळावर बुधवारी ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला. मात्र बारावी परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका त्यांच्या विद्यालयात शुक्रवार दि. 17 रोजी मिळणार आहे.
गेल्या वर्षी जिल्ह्यात बारावी निकालाची निकालाची टक्केवारी 99.61 होता. यंदा मात्र यामध्ये 5 .7 टक्के घट झाली आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे बारावीची परीक्षा झाली नव्हती. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळांकडून निकालाबाबत नियमांवली ठरविण्यात आली होती. यामध्ये दहावी परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांवर 30 टक्के, अकरावीच्या गुणांवर 30 टक्के आणि महाविद्यालय झालेल्या चाचण्यातील गुणांवर 40 टक्के याची सरासरी काढून विद्यार्थ्यांना मार्क देण्यात आले होते. त्यामुळे गेल्या वर्षी जादा निकाल लागला होता, अशी माहिती काही शिक्षण तज्ज्ञांनी दिली.
विभागात जिल्ह्याचा तिसरा क्रमांक
कोल्हापूर विभागात सांगली जिल्ह्याचा तिसरा क्रमांक आहे. कोल्हापूर जिल्ह्याने 96.41 टक्के गुण मिळवून पहिला क्रमांक पटकविला आहे. सातारा जिल्ह्याची टक्केवारी 94.23 आहे. एकूण विभागाचा (तीनही जिल्ह्याचा) निकाल 95.07 टक्के आहे.

Back to top button