पोलिसांची मदत हवी! मात्र, पोलिसांना मदत नको; टोल नाक्यावरील कर्मचार्‍यांच्या दुटप्पीपणामुळे अधिकार्‍यांत नाराजी | पुढारी

पोलिसांची मदत हवी! मात्र, पोलिसांना मदत नको; टोल नाक्यावरील कर्मचार्‍यांच्या दुटप्पीपणामुळे अधिकार्‍यांत नाराजी

संतोष शिंदे

पिंपरी : पुणे-मुंबई महामार्गावर सोमाटणे फाटा येथील टोल नाक्यावर पोलिसांनी कार चोरट्यांना पाठलाग करून पकडले. त्यावेळी चोरट्यांनी पोलिसांवर चाकूने हल्ला चढवला. पोलिसांनी देखील जीवाची पर्वा न करता तितक्याच ताकदीने प्रतिकार केला. मात्र, दुर्दैवाची बाब म्हणजे त्यावेळी टोल नाक्यावर असलेला एकही कर्मचारी पुढे आला नाही. त्यामुळे संकटकाळी सर्वांसाठी धावून येणार्‍या पोलिसांच्या मदतीला कोणीही येत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. टोल कर्मचार्‍यांच्या या दुटप्पी भूमिकेबाबत पोलिसांनी नाराजी व्यक्त केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शुक्रवारी (दि.3) मध्यरात्री दीडच्या सुमारास पोलिस निरीक्षक अजय जोगदंड, पोलिस कर्मचारी प्रदीप गुट्टे, एन. आर. काळे रात्रगस्त ड्युटी करीत होते. दरम्यान, त्यांना चोरटे कार घेऊन मुंबईच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी कारचा पाठलाग करून सोमाटणे टोलनाक्याजवळ चोरट्यांना गाठले. प्रदीप गुट्टे यांनी कारच्या खिडकीतून हात घालून चावी काढण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी त्यांच्यावर चाकू हल्ला केला. त्याच वेळी वरिष्ठ निरीक्षक अजय जोगदंड आणि पोलिस कर्मचारी काळे यांनी कारला दोन्ही बाजूने घेरले.

गोव्यात ब्रिटिश महिलेवर बलात्कारानंतर विनापरवाना मसाज पार्लरवर कारवाई

चोरट्यांनी त्यांच्याकडील मोठ्या चाकूने पोलिसांवर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कसेबसे स्वतःवरील वार हुकवले. त्यावेळी कारमध्ये आणखी दोन मोठे चाकू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आले. त्यामुळे शेवटी पोलिस निरीक्षक अजय जोगदंड यांनी पिस्तूल बाहेर काढून चोरट्यांवर रोखली. त्यामुळे चोरट्यांनी पोलिसांना धक्का मारून डोंगरात पळ काढला. पोलिसांनी डोंगर परिसर पिंजून काढला. मात्र, चोरटे मिळून आले नाही.

दरम्यान, पोलिस आणि चोरट्यांची धुमश्चक्री सुरू असताना टोल नाक्यावर दहापेक्षा जास्त कर्मचारी तैनात होते. यातील एकही पोलिसांच्या मदतीसाठी पुढे सरसावला नाही. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. टोलवरील सर्व कर्मचारी पोलिसांच्या मागे किंवा दूरवर उभे राहिले असते, तरीही चोरट्यांनी हल्ला करून पळून जाण्यापेक्षा आत्मसमर्पणाचा मार्ग अवलंबला असता, असे पोलिसांचे मत आहे. एकंदरीतच टोलवरील कर्मचार्‍यांच्या वागणुकीवर पोलिसांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कोल्‍हापूर : शिरीषनं नायब तहसिलदार झाल्याचा फोन केला तेव्हा आई- वडील विकत होते चिरमुरे, बिस्किटे

पावतीसाठी सर्वसामान्यांवर झडप

महामार्गावर असलेल्या टोल नाक्यावर अनेकदा पावती फाडण्याच्या कारणावरून वाद होतात. त्यावेळी टोलवरील कर्मचारी लगेच गाडीला घेराव घालतात. एखाद्या चालकाने अरेरावी केल्यास त्याच्यावर झडप घालून सर्वजण तुटून पडतात. मात्र, सर्वांसमोर पोलिसांवर जीवघेणा हल्ला होत असताना एकही कर्मचारी समोर न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

सीसीटीव्हीची देखभाल दुरुस्ती नाही

शहरात कोणतीही मोठी घटना घडल्यास शहराबाहेर पडणार्‍या टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येते. त्यामुळे टोल नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे सुस्थितीत असणे अपेक्षित आहे. दरम्यान, पोलिसांवर हल्ला झाल्यानंतर देखील टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करण्यात आले. मात्र, येथील सीसीटीव्हीची देखभाल दुरुस्थी होत नसल्याचे फुटेजवरून समोर आले आहे.

कार चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांनी आमच्यावर चाकूने हल्ला चढवला. त्यामुळे आमच्यात झटापट होऊन एक कर्मचारी जखमी झाला. त्यावेळी टोल नाक्यावरील कर्मचारी बघ्यांच्या भूमिकेत होते. त्यांनी पोलिसांची वेळीच मदत केली असती तर चोरट्यांना पकडणे शक्य झाले असते.
– अजय जोगदंड, पोलिस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक.

पोलिसांवर हल्ला झाला ‘त्या’ रात्री टोलवर साधारण दहा ते पंधरा कर्मचारी तैनात होते. मात्र, थेट पोलिसांवर हल्ला झाल्याने कर्मचारी देखील घाबरले. त्यामुळे कोणीही समोर आले नाही. तसेच, टोलवरील सीसीटीव्ही कॅमेरे देखील बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे.
– महादेव तुपारे, टोल प्लाझा, सोमाटणे.

 

Back to top button