
पणजी : पुढारी वृत्तसेवा; गोव्यातील हरमल बीच परिसरात एका ब्रिटिश महिलेवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर गोवा पोलीस बेकायदेशीर मसाज पार्लर, गाईड्स आणि विक्रेते यांच्यावर कारवाई करत आहे. अशा व्यक्तींकडून कोणतीही सेवा घेऊ नये, तसेच वस्तू खरेदी करू नयेत असे पोलिसांनी म्हटलेले आहे.
संबंधित ब्रिटिश महिलेवर मड बाथ देण्याच्या बहाण्याने बलात्कार करण्यात आल्याचे इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटले आहे. गोव्यात महिलांनी पुरुषांना मसाज करणे, किंवा पुरुषांनी महिलांना मसाज करणे यावर बंदी आहे, असे असतानाही हा गुन्हा घडलेला आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे गृह खाते आहे. त्यांनी म्हटले आहे, "आम्ही बेकायदेशीर मसाज पार्लरवर कारवाई करत आहोत. सर्व बेकायदेशीर मसाज पार्लर बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यांच्याकडे स्पाचा परवाना आहे, ज्यांनी पोलिस, आरोग्य आणि पर्यटन या तिन्ही विभागांकडे नोंदणी केली आहे, त्यांनाच फक्त व्यवसाय करता येईल. तसेज जे आर्युवेदिक पंचकर्म सेंटर आहे, तिथे फक्त आर्युवेद डॉक्टरच असले पाहिजेत."
काही फेरीवाले, विक्रेते बीचवर मसाज सेवा देतात, त्यांच्याकडे परवाना नसतो, अशांवरही कारवाई केली जाणार आहे. ज्या मसाज पार्लरकडे परवाना आहे, त्यांनी तो दर्शनी ठिकाणी ठेवण्याचा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
हे ही वाचलंत का?