कोल्‍हापूर : शिरीषनं नायब तहसिलदार झाल्याचा फोन केला तेव्हा आई- वडील विकत होते चिरमुरे, बिस्किटे

कोल्‍हापूर : शिरीषनं नायब तहसिलदार झाल्याचा फोन केला तेव्हा आई- वडील विकत होते चिरमुरे, बिस्किटे

शिरटी; कुणाल कांबळे : शिरिषच्या घरची परिस्थिती अंत्यत बेताची. वडील बापूसो हे शिरोळ, शिरटी परिसरातील आठवडी बाजारात चिरमुरे, बिस्किटे विकतात, तर आई विजया घरकाम तसेच पतीला कामात मदत करते. लहान बहीण ऐश्वर्या ही एमएससी केमिस्ट्रीचे शिक्षण घेऊन पुणे येथे काम करत आहे. शिरीषने नायब तहसिलदारपदी निवड झाल्याचे सांगण्यासाठी घरी आई-वडिलांना फोन केला तर त्यावेळेला दोघेही आठवडी बाजारातच चिरमुरे, बिस्किटे विकत होते. मुलाची नायब तहसीलदारपदी निवड झाल्याचे फोनवरचे बोलणे ऐकून आई – वडिलांना अश्रू अनावर झाले. त्यांचा ऊर आनंदाने भरून आला.

हसुर (ता. शिरोळ) येथील शिरीष बापूसो शहापुरे याची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परिक्षेमधून नायब तहसीलदारपदी निवड झाली. शिरीष हा ५९ वी रँक मिळवून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला आहे. त्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हे यश मिळवले आहे.

शिरिषचे प्राथमिक शिक्षण हसुर येथे तर माध्यमिक शिक्षण शिरटी हायस्कूल येथे झाले. झेले ज्युनिअर कॉलेज येथे १२ वी पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर आरआयटी इस्लामपूर येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून काही दिवस कामदेखील केले. मात्र त्यानंतर त्‍याने स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. यावेळी संपूर्ण कुटुंब त्याच्या पाठीशी उभे राहिले. आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील ग्रंथालयात त्याने अभ्यास सुरू केला.

त्याने यापूर्वी आरटीओ मुख्य परीक्षा आणि लोक पायलाटच्या मुलाखतीपर्यंत पोहचला होता. मात्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात त्याला यश मिळाले. त्याच्या या यशात त्याला बहीण ऐश्वर्याने आपल्या कमाईतून पैसे पाठवून मदत केली आहे. तसेच हसुरचे रहिवाशी बालवीर पाटील व सुनीता पाटील यांनीदेखील शिरिषला स्वतःच्या मुलाप्रमाणे मोलाची मदत केली आहे. शिरीष व ऐश्वर्या या दोघांनाही खूप कष्टातून आई-वडिलांनी शिकवले आहे. त्याचे चांगले फळ मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.

शुभेच्छांचा वर्षाव 

शिरिषची निवड झाल्याचे समजताच मूळ गावी हसुर येथे त्याचा सत्कार करण्यात आला. तसेच आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार उल्हास पाटील, भाजप युवा मोर्चाचे पृथ्वीराज यादव, शिरोळचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिडे, यासह विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी तसेच ग्रामस्थ मित्रमंडळीनी भेटून त्याला शुभेच्छा दिल्या.

हे ही वाचलंत का?  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news