विधानभवनावर बसपचा ‘आक्रोश मोर्चा’; मागण्या मान्य करा अन्यथा तीव्र आंदोलन | पुढारी

विधानभवनावर बसपचा ‘आक्रोश मोर्चा’; मागण्या मान्य करा अन्यथा तीव्र आंदोलन

येरवडा : पुढारी वृत्तसेवा

बहुजन समाज पक्ष, पुणे शहर व जिल्ह्याच्या वतीने विविध मागण्यांसंबंधी शुक्रवारी पुणे विधानभवनावर ‘विराट आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. पुणे स्टेशनजवळील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत सकाळी मोर्चाला सुरुवात करण्यात आली. बसपचे प्रदेश प्रभारी नितीन सिंह, प्रदेश प्रभारी प्रमोद रैना यांच्या मार्गदर्शनात प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. संदीप ताजणे, प्रदेश प्रभारी हुलगेश भाई चलवादी यांच्या नेतृत्वात या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

दुपारी बसपच्या शिष्टमंडळाच्या वतीने पुणे विभागीय आयुक्तांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. पेट्रोल-डिझेलवरील कर कपात करण्यात आली असली, तरी महागाईने जनता होरपळत आहे. गॅसचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे या सर्व वस्तूंचे दर कमी करावे आणि महागाईच्या दृष्टचक्रातून सत्ताधार्‍यांनी ‘सर्व जणांना’ बाहेर काढावे, असे आवाहन या वेळी प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. संदीप ताजने यांनी केले.

मोर्चात प्रदेश महासचिव सुदीप गायकवाड, प्रदेश सचिव भाऊ शिंदे, अजित ठोकळे, सुरेश गायकवाड, शीतलताई गायकवाड, बाळासाहेब आव्हारे, अप्पा लोकरे, जिल्हा प्रभारी रमेश अप्पा गायकवाड, मेहमूद जकाते उपस्थित होते. झोपडपट्टीधारकांना 500 चौरस फुटांचे घर द्यावे, उच्च न्यायालयाने मुस्लिमांना दिलेल्या 5% आरक्षणाची अंमलबजावणी करावी, तसेच पुणे मनपामध्ये समान पाणीवाटप करीत शहराला टँकरमुक्त करण्याची मागणी हुलगेश चलवादी यांच्याकडून करण्यात आली.

हेही वाचा 

‘बाजार हस्तक्षेप योजने’त कांद्याचा समावेश करावा : डॉ. भारती पवार

राहुरी : पोलीस व दरोडेखोर यांच्यातील सिनेस्टाईल थरार, पोलिस उपनिरीक्षक बोकील यांच्यावर सतुरने हल्ला

यंदाही राबवणार ‘सेतू’ अभ्यासक्रम; एम. डी. सिंह यांनी केले वेळापत्रक जाहीर

 

Back to top button