राहुरी : पोलीस व दरोडेखोर यांच्यातील सिनेस्टाईल थरार, पोलिस उपनिरीक्षक बोकील यांच्यावर सतुरने हल्ला | पुढारी

राहुरी : पोलीस व दरोडेखोर यांच्यातील सिनेस्टाईल थरार, पोलिस उपनिरीक्षक बोकील यांच्यावर सतुरने हल्ला

राहुरी :  पुढारी वृत्तसेवा
राहुरी शहरातील मल्हारवाडी रस्त्यावर दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या तयारीत असतानाच पोलिस पहाटे ३ वाजेच्या सुमारास हजर झाले. पोलिसांना पाहून सुसाट पळालेल्या दरोडेखोरांना पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये नाशिक येथे गंभीर प्रकारचे अनेक गुन्हे दाखल असलेले दोघांना पोलिसांनी पकडले. तिघेजण अंधाराचा फायदा घेत पळून गेले. त्यापैकी दोघांना शिर्डी येथून पकडण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली.
पोलीस व दरोडेखोर यांच्यातील सिनेस्टाईल थरार राहुरी शहरातील मल्हारवाडी रस्त्यावर रंगला होता. शनिवारी पहाटेच्या वेळी काही दरोडेखोर राहुरी शहरामध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ३ वाजता पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, पोलिस उपनिरीक्षक निरज बोकील, पोलिस हवालदार नदीम शेख, साखरे, आजिनाथ पाखरे, सोमनाथ जायभाये हे पथकासह मल्हारवाडी रस्ता परिसरातील सातपीर दर्गाजवळ आले.
त्यावेळी आवाज येत असलेल्या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली असता काही जण पळू लागले. सिनेस्टाईल पाठलाग केल्यानंतर पोलिसांच्या तावडीमध्ये मयुर राजू ढगे व इश्वर अशोक मोरे ( दोघे रा. नाशिक ) सापडले. तर रणजित केशव कांबळे, अजय पवार, रमेश वाकोडे (रा. अहिल्यादेवीनगर निफाड) राहुल मोरे सर्व रा. निफाड जि. नाशिक हे पळून जाण्यात यशस्वी झाले. पकडलेला आरोपी मयुर ढगे याने पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक बोकील यांच्यावर सत्तुरने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
परंतु पोलिसांनी आरोपी ढगे यास सतुरसह ताब्यात घेतले. ढगे याच्या हल्ल्यात पोलिस उपनिरीक्षक बोकील यांच्या हाताला दुखापत झाली.
काही तासातच पोलिसांनी पळून गेलेल्या दरोडेखांराचा शोध घेत त्यापैकी रमेश वाकोडे व रणजित कांबळे या दोघांना शिर्डी येथून ताब्यात घेतले आहे. राहुरी पोलिसांच्या तावडीत चार दरोडेखोर सापडले असून त्यांच्याकडे दरोडा टाकण्यासाठी असलेले हत्यारामध्ये सत्तुर, टॉमी  सापडली आहे. पोलिस निरीक्षक दराडे यांनी माहिती देताना सांगितले की, पकडलेल्या आरोपींवर नाशिक शहरामध्ये प्रॉपर्टी  संबंधी १० गंभीर गुन्हे दाखल आहेत. इतर आरोपींसह पकडलेल्या आरोपींची कसून चौकशी केली जात आहे.

Back to top button