नेतेमंडळी घरच्या महिलांना रिंगणात उतरविणार; गट-गणाच्या आरक्षणानंतर खरी लढत स्पष्ट होणार

नेतेमंडळी घरच्या महिलांना रिंगणात उतरविणार;  गट-गणाच्या आरक्षणानंतर खरी लढत स्पष्ट होणार
Published on
Updated on

अर्जुन खोपडे

भोर : भोर तालुक्यात जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीचे गणातील गावांच्या फेरबदलाचा फटका आजी – माजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांना बसला आहे. ओबीसी आरक्षण जाहीर झाले नाही, तर निवडणुका ओबीसींशिवाय होणार यामुळे महिला व पुरुष असेच आरक्षण राहणार असल्यामुळे सर्वच नेतेमंडळी स्वत:च्या घरातील महिलांना राजकारणात उतरवतील अशीच शक्यता दिसत आहे.

भोर तालुक्याची लोकसंख्या 1 लाख 67 हजार असून पूर्वी 55 हजार लोकसंख्येचा एक गट असे तीन गट आणि सहा गण होते. त्या ऐवजी 40 ते 42 हजारांचा एक असे चार गट व आठ गण करण्यात आले आहेत. सर्वात लहान गावांचा गण वेळू असून सर्वाधिक गावांचा गण भोलावडे आहे. तर सर्वात कमी 30 गावांचा गट वेळू – नसरापूर आहे. तर सर्वाधिक 40 गावांचा गट भोलावडे-शिंद गट आहे. यामुळे यात कही खुशी कही गम- अशी अवस्था आहे.

सर्वात मोठा फटका पुर्वीच्या संगमनेर-भोंगवली गटाला बसला आहे. या गटातील हातवे बुद्रुक, हातवे खुर्द, तांभाड, मोहरीबुद्रुक ही गावे वेळू-नसरापूर गटात टाकल्याने या गटातील माजी जिल्हा परिषद सदस्या तृप्ती खुटवड आणि माजी उपसभापती विक्रम खुटवड व माजी सभापती लहू शेलार यांना फटका बसला आहे. वेळू-नसरापूर गट पुणे- सातारा महामार्गावरील व नसरापूर- वेल्हे रस्त्यावरील गावांचा समावेश आहे.

या गटात गावे मोठी असल्याने सर्वात कमी 30 गावे आहेत. पूर्वी या गटातून माजी जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे निवडून आले होते, तर गणात अमोल पांगारे विजयी झाले होते. सध्या कोंडे व पांगारे या दोघांच्या पत्नी गणाचे व गटाचे नेतृत्व करीत आहेत. या वेळी कुलदीप कोंडे, अमोल पांगारे निवडणूक लढवू शकतात. या गटातील एक गण दुसर्‍या गटाला जोडला आहे. या गटात नव्याने गुंजन मावळ भागातील गावे आल्याने माजी जि. प. सदस्या तृप्ती खुटवड युवानेते विक्रम खुटवड व माजी सभापती लहु शेलार या गटात लढणार की पूर्वीच्या भोंगवली- कामथडी गटात लढणार हे पाहावे लागणार आहे.

याशिवाय काँग्रेसकडुन माजी सरपंच माऊली पांगारे यांचे नाव चर्चेत आहे. पूर्वीचा संगमनेर- भोंगवली गटाचे नाव बदलून भोंगवली-कामथडी गट करण्यात आला आहे. या गटात 39 गावे असून कामथडीपासून सारोळे ते पूर्व पानभागातील टापरेवाडी पर्यंतच्या गावांचा समावेश आहे. या गटातील एक गण पूर्णपणे बदल झालेला आहे. पूर्वी या गटातून माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे व तृप्ती किरवे यांनी जिल्हा परिषदेत नेतृत्व केले होते.

या वेळी राष्ट्रवादीकडून चंद्रकांत बाठे, सुनीता बाठे, विक्रम खुटवड, तृप्ती खुटवड तर काँग्रेसकडून शैलेश सोनवणे, पोपट सुके, पंचायत समिती सदस्य रोहन बाठे इच्छुक आहेत. शिवसेनेतून अद्याप नावे चर्चेत दिसत नाहीत. उमेदवारीवरून या गटात मोठी रस्सीखेच पाहावयास मिळणार आहे. भोलावडे-शिंद हा नवीन गट करण्यात आला असून या गटात सर्वाधिक 40 गावे असून महुडेखोरे, भाटघर धरण भागातील वेळवंड खोरे, भुतोडेखोरे तसेच भोर- महाड रस्त्यावरील गावे निरादेवघर धरण भागातील हिर्डोशीखोरे रिंगरोडवरील गावांचा समावेश असलेला मोठा गट आहे.

पूर्वीच्या एका गटाचे दोन गट केले आहेत, त्यामुळे या गटात उमेदवारांची मोठी धावपळ होणार असून या गटात काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे यांच्या भोलावडे- नसरापूर व राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्या उत्रोली-कारी गटातील गावे एकत्र केली आहेत, त्यामुळे गटात मोठी चुरस आहे. या वेळी विठ्ठल आवाळे यांच्यासह मानसिंग धुमाळ हे प्रमुख दावेदार आहेत. उत्रोली-कारी हा पूर्वीचाच गट असून तसाच गट असून नावही तेच आहे. 39 गावे आहेत.

फक्त या गटातील गावे कमी करून भोलावडे-शिंद या दुसर्‍या गटाला जोडली आहेत. या गटात हिर्डोशी भागातील रायरी एकच गाव ठेवून बाकीची गावे शिंद गणाला जोडली आहेत. रायरी गाव डोंगरातील गावांपासुन बाजूला केल्याने नागरिक नाराजी व्यक्त करतात. या गटात आंबवडेखोरे, वीसगाव खोरे, भोर- महाड रस्त्यावरील काही गावांचा समावेश करून गट तयार करण्यात आला आहे. या वेळी आनंदराव आंबवले माजी जिल्हा परिषद सदस्या गीतांजली आंबवले, उद्योजक विलास वरे, अनिल सावले , दमयंतीताई जाधव, श्रीधर किंद्रे, माजी सभापती संतोष घोरपडे इच्छुक आहेत .

आमदार संग्राम थोपटे यांचे गावही याच गटात येत असून काँग्रेसच्या दृष्टीने हा महत्त्वाचा गट आहे. त्यामुळे या वेळीही चुरशीची लढाई पाहावयास मिळणार आहे. एकंदरीत प्रभाग रचनेतील मोठ्या प्रमाणात झालेल्या गावांच्या फेरबदलामुळे भोर तालुक्यातील अनेक दिग्गज नेत्याचे गट आणी गण बदलले आहेत. शिवाय ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका झाल्यास प्रत्येक पक्षातील नेते आपल्या पत्नीला गटात किवा गणात निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार हे मात्र नक्की.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news