अंगावर टाकले उकळते पाणी! दोन कचरावेचकांचा मृत्यू; सासवड येथील भीषण प्रकार

अंगावर टाकले उकळते पाणी! दोन कचरावेचकांचा मृत्यू; सासवड येथील भीषण प्रकार

सासवड : पुढारी वृत्तसेवा

हातगाडीवर अंडाभुर्जी विकणाऱ्याने केलेल्या मारहाणीत दोन अनोळखी कचरावेचकांचा मृत्यू झाला. नीलेश ऊर्फ पप्पू जयवंत जगताप (रा. ताथेवाडी, सासवड) असे हातगाडी चालकाचे नाव आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यास अटक केली आहे. याबाबत सहायक पोलिस उपनिरीक्षक सुनील चिखले यांनी सासवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २४ रोजी सासवड येथील भोंगळे वाइन्सशेजारी एका ५० वर्षीय अनोळखी कचरावेचकाचा मृतदेह आढळून आला. त्याचा तपास करीत असताना फिर्यादी चिखले यांनी घटनास्थळाच्या बाजूस काम करणारे सुनील रामचंद्र मुळीक यांच्याकडे विचारपूस केली. मुळीक यांनी, दि. २३ मे रोजी दुपारी कट्ट्यावर बसलेल्या अंदाजे ५० आणि ६० वर्षे वयाच्या कचरावेचकांना येथे अंडाभुर्जीची गाडी लावणाऱ्या पप्पू जगताप याने काठीने मारहाण केली. तसेच येथील खंडोबानगर येथील शेवंताबाई जाधव (वय ६०) यांनाही काठीने बेदम मारहाण केल्याचे सांगितले.

अंगावर टाकले उकळते पाणी

मारहाणीनंतर हे तिघे तेथेच पडून होते. ते उठत नाही म्हणून पप्पू याने ५० वर्षे वयाच्या पुरुषावर उकळते पाणी टाकले. पुन्हा बेदम मारहाण केली. त्यानंतर साधारण रात्री ८ वाजेपर्यंत तो निपचीत पडून होता. त्यानंतर त्याला ते रुग्णवाहिकेतून घेऊन गेले. दुसर्‍या दिवशी सदर व्यक्ती मयत झाल्याचे समजले. त्यानंतर दि. ३० रोजी पप्पू जगताप याने मारहाण केलेली ६० वर्षे वयाच्या व्यक्तीचा ससून येथे उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याचे समजले, असे मुळीक यांनी सांगितले.

आरोपी नीलेश ऊर्फ पप्पू जगताप याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news