परदेशी शिक्षणासाठी पाठबळ; शिष्यवृत्ती योजनेसाठी 22 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन | पुढारी

परदेशी शिक्षणासाठी पाठबळ; शिष्यवृत्ती योजनेसाठी 22 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : पुढारी वृत्तसेवा

परदेशी शिक्षणासाठी राज्य सरकारकडून पाठबळ दिले जात असून ‘राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती’ योजनेसाठी 22 जूनपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने केले आहे. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील 75 विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी ‘राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती’ योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते.

अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पीएचडी) विशेष अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांची परदेशातील शिक्षणाची मागणी लक्षात घेता टप्प्याटप्प्याने विद्यार्थी संख्येत वाढ करण्यात येत आहे. या योजनेमुळे 714 विद्यार्थ्यांचे परदेशातील शिक्षणाचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

2022-23 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत 22 जून 2022 पर्यंत आहे. योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि पीएचडीसाठी क्यूएस जागतिक विद्यापीठ मानांकन 300 च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणार्‍या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. या योजनेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले.

या बाबींचा मिळेल लाभ

योजनेसाठी पात्र असणार्‍या विद्यार्थ्यांना विमान प्रवासभाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेचे शिक्षण शुल्क, निर्वाहभत्ता, आकस्मिक खर्च याचा लाभ मिळणार आहेत. एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती लागू राहणार नाही. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्षे व पीएचडीसाठी 40 वर्षे ही कमाल वयोमर्यादा असेल.

हेही वाचा

महिलांना मिळणार सवलतीत उपचार; लोकमान्य रुग्णालयात महिलांसाठी क्लिनिक

सिंहगड घाट रस्त्यावरील दरडी संरक्षित करणार

व्वा रे पठ्ठे…! अहिल्यादेवींच्या जयंतीदिनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन!

Back to top button