

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा
सिंहगड घाट रस्त्यावर पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका आहे. तो टाळण्यासाठी प्रशासनाने घाट रस्त्यावरील उर्वरित दरडी संरक्षित करण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. यासाठी वनखात्याने दीड कोटी रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.
पंधरा वर्षांपूर्वी सिंहगड घाट रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. रुंदीकरणासाठी तोडण्यात आलेल्या कड्यांच्या दरडी पावसाळ्यात कोसळू लागल्या. त्यामुळे वारंवार घाट रस्ता बंद करावा लागला. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जवळपास साडेतीन किलोमीटर अंतराच्या दरडी संरक्षित करण्यात आल्या. मात्र, पुरेशा निधीअभावी उर्वरित धोकादायक दरडी तशाच राहिल्या. घाट रस्त्यावर असलेल्या दरडी मुरुम मातीच्या आहेत. त्यामुळे या दरडी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने संरक्षित करण्यात येणार आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता नामदेव राठोड म्हणाले, मुंबईतील आयआयटी संस्थेच्या तज्ज्ञांकडून घाट रस्त्यावर कोसळणार्या संभाव्य दरडींची पाहणी करण्यात येणार आहे. दरडी संरक्षित करण्यासाठी लोखंडी जाळी लावण्यात आली आहे. मात्र, मुरुम मातीच्या दरडी संरक्षित करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे.
याबाबत पुणे (भांबुर्डा) वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप सकपाळ म्हणाले, सद्य:स्थितीत दरडींचा धोका नाही. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक यंत्रणा उभी केली आहे. घाट रस्त्याची पाहणी करून बांधकाम खात्यामार्फत दरडी संरक्षित करण्यात येणार आहेत.
ई बस बंद झाल्यानंतर खासगी वाहनांची वाहतूक सुरू झाली. शनिवार, रविवार तसेच गुरुवारी व इतर दिवशीही हजारोंच्या संख्येने पर्यटक गडावर गर्दी करीत आहेत. पावसाळा तोंडावर आला आहे. जोरदार पावसात मुरुम, मातीच्या दरडी कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना केली जात आहे.