

पुणे : पुढारी वृत्तसेवा
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गातील गणेशखिंड रस्त्यावरील मेट्रोचे 100 पिलर प्राधान्याने आणि गतीने पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
पालिकेच्या खर्चातून विद्यापीठ चौकातून औंधकडे जाणार्या रस्त्यावर ग्रेड सेपरेटर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 'पीएमआरडीए'च्या वतीने हिंजवडी ते शिवाजीनगर खासगी सहभागातून मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे.
मेट्रो कामासंदर्भात बुधवारी महापालिका आणि पीएमआरडीएच्या अधिकार्यांची बैठक झाली. यावेळी गणेशखिंड रस्त्यावरील कामासंदर्भात चर्चा झाली.
गणेशखिंड रस्त्यावरील 100 पिलरचे काम गतीने पूर्ण होण्यासाठी अतिरिक्त यंत्रणा लावावी, गरज असेल तेथील पदपथ काढणे, आवश्यकता असेल बॅरिकेडिंग करणे, अनावश्यक बॅरिकेडिंग काढणे, रस्त्यावरील अतिक्रमणे हटविणे, कामासाठी आवश्यक असणारी शासकीय कार्यालयांची जागा ताब्यात घेणे, केंद्र सरकारच्या काही संस्थांचे स्थलांतर करणे यावर चर्चा झाली.
विद्यापीठ चौकातून औंधकडे जाण्यासाठी ग्रेड सेपरेटर केला जाणार आहे. हा भुयारी मार्गाचा खर्च महापालिका करणार असून, या कामासाठी मेट्रोचे काम करणार्या सल्लागाराचीच नियुक्ती केली जाणार असल्याचे विक्रम कुमार यांनी सांगितले.