वर्चस्व असलेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात भाजपाला कडव्या आव्हानाची शक्यता

वर्चस्व असलेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात भाजपाला कडव्या आव्हानाची शक्यता

पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात बारा नगरसेवकांच्या जागांपैकी महिलांसाठी सहा जागा आरक्षित झाल्या आहेत. मतदारसंघात जागांचे वाटप समान झाले असले, तरी भाजपचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात या वेळी काही जागांवर विरोधकांचे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.

या मतदारसंघांत चार प्रभाग आहेत. त्यापैकी दोन प्रभागांत भाजपसमोर तगडे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. कसबा पेठ मतदारसंघात गेल्या वेळी 17 नगरसेवक होते. त्यांची संख्या घटून 12 झाली आहे. गेल्या वेळी 17 पैकी भाजपचे 12 जण, तर राष्ट्रवादी व शिवसेनेचे प्रत्येकी दोन, तर काँग्रेसचा एक नगरसेवक होता. विरोधी पक्षांतील चौघांना त्यांच्या जागी पुन्हा लढण्याची संधी मिळणार आहे. नव्या प्रभागरचना व आरक्षणामुळे भाजपच्या किमान चार नगरसेवकांना पुन्हा संधी मिळणार नाही.

भाजपचा बालेकिल्ला असलेला, मात्र उमेदवार ठरविण्याच्या दृष्टीने अवघड ठरणार्‍या प्रभाग क्रमांक 17 (शनिवार पेठ, नवी पेठ) मध्ये महिलांसाठी दोन जागा आरक्षित झाल्या. सर्वसाधारण गटासाठी एकच जागा आहे. या एका जागेसाठी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृह नेते धीरज घाटे, भाजयुमोचे शहराध्यक्ष बापू मानकर, आमदार मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल, माजी नगरसेवक राजेश येनपुरे, प्रमोद कोंढरे यांच्यासह अनेक जण इच्छुक आहेत. त्यांच्यापैकी एकाची निवड करताना भाजप पक्षश्रेष्ठींची कसोटी लागणार आहे. खासदार गिरीश बापट यांची स्नुषा स्वरदा बापट या प्रभागातून लढण्याची शक्यता आहे.

लगतच्या प्रभाग क्रमांक 18 (शनिवारवाडा कसबा पेठ) मध्ये तीनपैकी एक जागा महिलेसाठी, तर उर्वरित दोन जागा सर्वसाधारण गटासाठी आहेत. काँग्रेसचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी येथे प्रचाराला प्रारंभ केला असून, त्यांच्यासमोर भाजपचा उमेदवार कोण असेल, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. धंगेकर त्यांच्या पत्नीलासुद्धा उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. महाविकास आघाडी होणार की नाही, याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे. शिवसेनेकडून राजेंद्र शिंदे, निकिता मारटकर, मनसेकडून प्रल्हाद गवळी हेही इच्छुक आहेत. भाजपकडून योगेश समेळ, पुष्कर तुळजापूरकर, उमेश चव्हाण, अरविंद कोठारी यांची नावे चर्चेत आहेत.

प्रभाग क्रमांक 29 (घोरपडेपेठ उद्यान – महात्मा फुले मंडई) मध्ये दोन जागा सर्वसाधारण गटातील महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. या ठिकाणी भाजपचे चार नगरसेवक गेल्या वेळी भाजपकडून निवडून आले होते. अजय खेडेकर, सम्राट थोरात हे माजी नगरसेवक इच्छुक आहेत. काँग्रेसकडून अजित दरेकर, कमल व्यवहारे, राष्ट्रवादीकडून अण्णा थोरात यांचा मुलगा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. नारायण चव्हाण हेदेखील इच्छुक आहेत. प्रभाग क्रमांक 28 (महात्मा फुले स्मारक भवानी पेठ) येथे गेल्या वेळी विरोधकांनी बाजी मारली होती. या वेळीही विरोधकांचे आव्हान तेथे राहणार आहे. राष्ट्रवादीचे वनराज आंदेकर, शिवसेनेचे विशाल धनवडे या नगरसेवकांनी प्रचाराला प्रारंभ केला आहे. तेथे भाजपला मातब्बर उमेदवारांची फळी उभी करावी लागेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news