मातब्बरांचा पत्ता कट नाही, पण उमेदवारी नेमकी द्यायची कुणाला? कोथरूडमध्ये भाजप, राष्ट्रवादीसमोर प्रश्न | पुढारी

मातब्बरांचा पत्ता कट नाही, पण उमेदवारी नेमकी द्यायची कुणाला? कोथरूडमध्ये भाजप, राष्ट्रवादीसमोर प्रश्न

पुणे : आरक्षणानंतर कोथरूड विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले आहे. भाजप आणि महाविकास आघाडीतील दिग्गजांचे मार्ग बर्‍यापैकी मोकळे झाले असून, याचा फायदा अन्य उमेदवारांनाही होण्याची शक्यता आहे. कोथरूडमध्ये केवळ एका प्रभागात अनुसूचित जमातीचे आरक्षण असल्याने कोणत्याही मातब्बराचा पत्ता कट झालेला नाही. आता उमेदवारी नेमकी कोणाला द्यायची, हाच प्रश्न भाजपला आणि काही प्रमाणात राष्ट्रवादीला सतावणार आहे.

कोथरूड विधानसभा मतदारसंघावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळते. गेल्या निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग झाल्याने भाजप वगळता सर्वच पक्षांतील उमेदवारांची दाणादाण उडाली होती. याला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काही उमेदवारांचा अपवाद आहे. मनसेला तर खातेही उघडता आले नव्हते. मात्र, महापालिका निवडणुकीच्या प्रभागरचनेमुळे भाजपसह महाविकास आघाडीच्या प्रमुख दावेदारांचे प्रभाग भरभक्कम झाले आहेत. आरक्षण आणि प्रभागरचना पाहता तुल्यबळ उमेदवार समोरासमोर येण्याची शक्यता कमीच आहे.

मोबाईलवर ‘हॉरर’ व्हिडिओ पाहिला; नंतर बाहुलीला फाशी देऊन चिमुरड्याने घेतला गळफास, पिंपरीतील धक्कादायक घटना

प्रभाग 13 (बाणेर सूस-म्हाळुंगे) हा दोन सदस्यांचा प्रभागात एक जागा खुल्या गटातील महिलेला आणि एक जागा खुली झाल्याने राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक बाबूराव चांदेरे यांचा मार्ग सुकर झाला आहे. असे असले तरी या प्रभागात भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर, शिवसेनेचे दिलीप मुरकुटे यांच्यामुळे लढत रंगतदार होईल. येथे ज्योती कळमकर, पूनम विधाते हेही इच्छुक आहेत. प्रभाग 14 मध्ये (पाषाण बावधन) मध्ये एक जागा अनु. जमाती खुल्या गटासाठी, एक जागा खुल्या गटातील महिलेसाठी राखीव असून, एक जागा खुल्या गटासाठी आहे. त्यामुळे या प्रभागात माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, रोहिनी चिमटे, किरण दगडे पाटील, राहुल कोकाटे हे इच्छुक आहेत.

प्रभाग 30 (जयभवानीनगर-केळेवाडी) मध्ये एक जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून, दोन जागा खुल्या झाल्या आहेत. त्यामुळे या प्रभागात राष्ट्रवादीचे दीपक मानकर, काँग्रेसचे चंदू कदम यांचा मार्ग सुकर झाला आहे. भाजपकडून या प्रभागात माजी नगरसेविका छाया मारणे यांना नवीन उमेदवारांना सोबत घेऊन खिंड लढवावी लागणार आहे.

PMJJBY-PMSBY : केंद्राने पीएम जीवन ज्योती आणि सुरक्षा विमा योजनेचा प्रीमियम वाढवला, जाणून घ्या नवे दर

प्रभाग 31 (कोथरूड गावठाण -शिवतीर्थनगर) मध्ये एक जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून, दोन जागा खुल्या झाल्या आहेत. या प्रभागात शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार, योगेश मोकाटे, मनसेचे किशोर शिंदे, सुधीर धावडे या ठिकाणी भाजपकडून दोन माजी नगरसेविकांसह शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेले शाम देशपांडे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. प्रभाग 32 (भुसारी कॉलनी बावधन खुर्द) मध्ये दोन जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून, एक जागा खुली आहे. त्यामुळे या प्रभागात राष्ट्रवादीचे जयश्री मारणे, बंडू केमसे, भाजपे दिलीप वेडे पाटील, अल्पना वरपे, श्रद्धा प्रभुणे, मनसेचे पुष्पा कनोजिया, राजेंद्र वेडे पाटील यांच्यात समना रंगण्याची शक्यता आहे.

राज्यातील पहिल्या इलेक्ट्रिक एसटीचा लोकार्पण सोहळा संपन्न

प्रभाग 33 मध्ये एक जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून, दोन जागा खुल्या झाल्या आहेत. भाजपचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, मंजुश्री खर्डेकर यांच्यासह इच्छुकांची मोठी रांग आहे. प्रभाग 36 (कर्वेनगर) मध्ये दोन जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून, एक जागा खुली झाली आहे. त्यामुळे या प्रभागात भाजपसमोर माजी नगरसेवक सुशील मेंगडे की राजाभाऊ बराटे यांना उमेदवारी द्यायची, असा प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच या ठिकाणी भाजपकडून महिला इच्छुकांचीही मोठी संख्या आहे. या प्रभागात राष्ट्रवादीकडून माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने, स्वप्नील दुधाने, नंदिनी पानेकर, रेश्मा बराटे, संगीता बराटे, शिवसेनेकडून वैशाली दिघे, काँग्रेसचे विजय खळदकर आदी इच्छुक आहे.

Back to top button