पुणे : आपला मुलगा समजून दुसर्‍याच मुलावर अंत्यसंस्कार | पुढारी

पुणे : आपला मुलगा समजून दुसर्‍याच मुलावर अंत्यसंस्कार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आपल्याच मुलाचा मृतदेह असल्याचे समजून धोत्रे नातेवाईकांनी अनोळखी मुलाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. स्वारगेट ठाण्याच्या हद्दीतील पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा मृत्यू झाला. याच दरम्यान हडपसर येथे आणखी एका मुलाचा पोहत असताना मृत्यू झाला. धोत्रे यांच्या मुलाचे वर्णन हडपसर येथे सापडलेल्या मुलाच्या मृतदेहाशी मिळताजुळता असल्याचे समजल्यानंतर ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. संबंधित मुलाच्या हातातील रबर बँडमुळे ओळख नंतर पटली.

भूषण लक्ष्मण धोत्रे (वय १८, पिंपरी-चिंचवड) त्याच्या मामाकडे स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहण्यासाठी आला होता. 24 मे रोजी दुपारी जास्त उकाडा वाढल्याने तो मित्रांसोबत कॅनॉलमध्ये पोहण्यासाठी गेला. दरम्यान भूषण पोहत असताना अचानक बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही बातमी समजल्यानंतर त्याचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले. स्थानिक लोक रात्रभर घटनास्थळी बॅटरी लावून मृतदेह वर येण्याची वाट पाहत होते. दरम्यान एका मुलाचा मृतदेह त्यांना यावेळी आढळला. मुलाच्या नातेवाईकांनीही हा भूषणचाच मृतदेह असल्याचे सांगितले. त्यावेळी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून तो मृतदेह कुटुंबियांच्या हवाली करण्यात आला. त्यांनी त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

मात्र, 24 मे रोजी दुपारी सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या परिसरात बारा वाजताच्या सुमारास वेदांत संजय कदम (वय 17) हा मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला असताना कॅनॉलमध्ये बुडाला असल्याबाबतच्या गुन्ह्याची नोंद पोलिसांनी केली. याच दरम्यान हडपसर पोलिसांना पाण्यात वाहत आलेला एक मृतदेह मिळाला.

त्यानुसार त्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी धोत्रे यांच्या कुटुंबियांना, तसेच वेदांत कदम यांच्या कुटुंबियांना बोलावले. तो मृतदेहदेखील विदृप झाला होता. त्याच्या हातात रॉयल एन्फील्ड नावाचा रबर बँड असल्याने हा मृतदेह भूषण धोत्रे याचाच असल्याची धोत्रे यांच्या कुटुंबाची खात्री पटली. कदम कुटुंबियांनी देखील हा मृतदेह त्यांच्या मुलाचा नसल्याचे स्पष्ट केले. त्यावेळी धोत्रे यांनी गैरसमजुतीने दुसर्‍याच मुलावर अंत्यसंस्कार केल्याचे कुटुंबियांनी मान्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, हडपसर येथे मिळालेल्या मृतदेहाची धोत्रे कुटुंबियांनी ओळख पटवल्याने त्यांनी हडपसर येथील विद्युत दाहिनीत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.

या प्रकरणात ज्या ठिकाणी भूषण बुडाला होता. त्याच ठिकाणी त्यांना त्याच्याशी मिळता-जुळता मृतदेह आढळल्याने कुंटुबियांची ओळख पटल्यानंतर त्यांना सर्व कायदेशीर पूर्तता करून मृतदेह देण्यात आला. परंतु, अंत्यसंस्कार झाल्यानंतर हडपसर येथे आणखी एक मुलाचा मृतदेह मिळाला. त्यावेळी कदम आणि धोत्रे कुटुंबियांना बोलावले. त्यावेळी कदम कुटुंबियांनी हा मृतदेह त्यांच्या मुलाचा नसल्याचे सांगितले. परंतु, हातातील बँड पाहून धोत्रे कुटुंबाची खात्री पटली. त्यांनी गैरसमजुतीतून सुरवातीला अंत्यसंस्कार केले असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर त्यांना सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी देण्यात आला.

– प्रशांत संदे, सहायक पोलिस निरीक्षक, स्वारगेट पोलिस ठाणे.

सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत जाणार्‍या कॅनोलमध्ये मित्रांसोबत वेदांत कदम पोहण्यासाठी गेला होता. त्यावेळी तो वाहून गेला होता. बराच शोध घेऊनही तो सापडला नाही. त्यानंतर त्याच्या घरच्यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणात धोत्रे कुटुंबियांनी दोन मुलांवर अंत्यसंस्कार केले. या सर्व घटनेनंतर मात्र कदम कुटुंबियांकडून अद्यापही संदिग्धता व्यक्त करण्यात येत आहे.

– प्रमोद वाघमारे, गुन्हे निरीक्षक, सिंहगड रोड पोलिस ठाणे.

हेही वाचा

Back to top button