UPSC Result : युपीएससीमध्ये नागपुरातील तीन विद्यार्थ्यांनी मारली बाजी | पुढारी

UPSC Result : युपीएससीमध्ये नागपुरातील तीन विद्यार्थ्यांनी मारली बाजी

नागपुर; पुढारी वृत्तसेवा : युपीएससीमध्ये नागपुरातील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या तीन विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेचा निकाल सोमवारी (३० मे) जाहीर झाला. यात उपराजधानीच्या भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नागपूरमधून सहा उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या. यातील तीन उमेदवारांनी या परीक्षेत बाजी मारली आहे. शुभम भैसारे (९७ वी रँक), सुमीत रामटेके (३५८ वी रँक) व शुभम नगराळे (५६८ वी रँक) हे तीन विद्यार्थी आहेत. (UPSC Nagpur Result)

गेल्या वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा २०२० ची मुख्य मुलाखत फेरी २ ऑगस्ट ते २२ सप्टेंबर २०२१ या कालावधीत घेण्यात आली होती. त्यानंतर २४ सप्टेंबर २०२१ रोजी अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. या वर्षी मुलाखतीची प्रक्रिया २६ मे २०२२ रोजी संपली. त्यामुळे अंतिम निकाल सोमवारी जाहीर झाला.

वर्ध्याच्या आकांक्षा तामगाडगेला देशपातळीवर ५६२ वी रँक

सेवाग्रामच्या महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेची विद्यार्थिनी डॉ. आकांक्षा तामगाडगे हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. तिची देशपातळीवरील रँक ५६२ आहे. तिने परराष्ट्र सेवेत जाण्याचा मानस व्यक्त केला आहे. ती २०१८ मध्ये एमबीबीएस उत्तीर्ण झाल्यानंतर परीक्षेच्या तयारीला लागली होती. तिसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण झाल्याचे तिने सांगितले.

तिचे आई आणि वडील दोघेही वणी येथे डॅाक्टर आहेत. वडील डॉ. मिलिंद खासगी रूग्णालयात प्रॅक्टीस करतात व आई डॉ. माधुरी सरकारी सेवेत आहेत. दोघांनीही सतत प्रोत्साहन दिल्याचे आकांक्षाने सांगितले. पदव्युत्तर पदवी शिक्षण घेण्यापेक्षा केंद्रीय परीक्षा देण्याकडे कल असल्याने ती पुण्यात राहून खासगी वर्गात शिकली. तिथे तयारी करीत अखेर तिसऱ्या प्रयत्नात ती यशस्वी झाली. युपीएससी परीक्षा देऊन उत्तीर्ण करणारी तिच्या घरातील ती पहिलीच आहे.

आयएएस प्रशिक्षण केंद्राचा शुभम भैसारे हा गोंदीया जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील सौंदडचा रहिवासी आहे. २०१७ मध्ये इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर तो दिल्लीत नोकरीला होता. त्याने चौथ्या प्रयत्नात आयएएसची परीक्षा उत्तीर्ण केली. वडील अशोक भैसारे हे जिल्हा न्यायाधीश होते. तर आई गृहिणी आहे. लहान भाऊ सुबोध एलएलबी, एलएलएम झाला आहे. शुभम नगराळे वर्धा येथील रहिवासी आहे. त्याचे वडील प्राचार्य तर आई शिक्षिका होती. सध्या तो दिल्लीत नोकरीला आहे.

हेही वाचा

Back to top button