शिराळा : सशांची शिकार करणारे पाच अटकेत

शिराळा : सशांची शिकार करणारे पाच अटकेत

शिराळा : पुढारी वृत्तसेवा
खोतवाडी (ता. शाहूवाडी ) येथील मांडलाई पठार परिसरात पिसोरा (गेळा ) व सशांची शिकार करणार्‍या पाच जणांना वनविभागाच्या पथकाने पकडले. त्यांच्याबरोबर असलेले दोघेजण फरारी झाले आहेत. त्यांच्याकडे शिकार केलेल्या दोन पिसोरा, दोन ससे , बंदुका, काडतुसे मिळाली आहेत.

प्रवीण विश्वास बोरगे (29), बाजीराव बाबू बोरगे (45 ), मारुती पांडुरंग वरे (30), संजय हिंदूराव भोसले (33), रामचंद्र बाबू बोरगे (32) (सर्व रा. वरेवाडी, ता. शाहूवाडी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. तर आबाजी बाजीराव बोरगे व अमोल शिवाजी रवंदे हे दोघे फरार झाले आहेत. अटकेतील पाचही संशयितांना येथील प्रथमवर्ग न्यायालयाने सोमवार (दि. 30) पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे, अशी माहिती मलकापूर परिक्षेत्र अधिकारी अमित भोसले यांनी दिली. मांडलाई पठार परिसरात गुरुवारी (दि.26) रात्री काहीजण शिकारीसाठी गेले होते. वनविभागाच्या पथकाने मांडलाई पठारावर खोतवाडी ते कुंभारवाडी दरम्यान रात्री दहापासून पाळत सुरू केली. त्यावेळी या परिसरातील हुलवाणी नावाच्या ठिकाणी रात्री बाराच्या सुमारास गोळीबार झाल्याचा आवाज आला.

साडेबाराच्या सुमारास दोन मोटारसायकल (एम.एच. 03, सीई 7939 व एम. एच. 14 बी. एन. 3204) वरून प्रवीण बोरगे, बाजीराव बोरगे, मारुती वरे, संजय भोसले हे चौघेजण जात असल्याचे दिसले. त्यांची वन विभागाच्या पथकाने तपासणी केली असता त्यांच्याकडे मारलेले दोन पिसोरा व दोन ससे, तेरा जिवंत काडतुसे, 6 वापरलेली काडतुसे असा मुद्देमाल सापडला. त्यावेळी तिथे आलेला आबाजी बोरगे तिथून पसार झाला. चौकशी सुरू असताना दीडच्या सुमारास दुसर्‍या दुचाकीवरून रामचंद्र बोरगे व अमोल रवंदे मारलेल्या प्राण्याचे मांस घेऊन जात असल्याचे पथकाला दिसले. त्यांना थांबवताना त्यांनी कर्मचार्‍यांशी झटापट झाली. त्यात पाठीमागे बसलेला रामचंद्र बोरगे सापडला. पण अमोल रवंदे गाडीसह पसार झाला. सापडलेल्या तीन बंदुकांपैकी एक परवानाधारक तर दोन गावठी आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news