

पुणे : लहरी हवामानामुळे कोकणातील जांभळाचे उत्पादन यंदा अवघे पंधरा टक्क्यांवर आले आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी मोठी असल्याने एरवीच्या तुलनेत जांभळांचे दर दुपटीने वधारले आहेत. सध्या बाजारात 10 किलोला 1 हजार 200 ते 2 हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे.
तर, किरकोळ बाजारात 300 ते 350 रुपये किलो दराने जांभळांची विक्री सुरू आहे. कोकणातील सावंतवाडी, कणकंडा घाट, कुडाळ आदी भागातून दरवर्षी जांभळे बाजारात येतात. एरवी दररोज 80 ते 100 क्रेट बाजारात दाखल होतात. यंदा मात्र उत्पादन दहा ते पंधरा टक्क्यांवर आल्याने 15 ते 17 किलोचे 10 ते 15 क्रेट बाजारात दाखल होत आहेत.
कोरोनामुळे दोन वर्षे काढणी न झाल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. याखेरीज उतिउष्णता तसेच अवकाळी पावसामुळे फळांची गळ मोठ्या प्रमाणात झाल्याने बाजारातील आवक घटली आहे. सध्या बाजारात उपलब्धतेनुसार कोकणातील जांभळांची आवक होत आहे. याखेरीज बारामती, इचलकरंजी, सांगली, कोल्हापूर येथून जांभळे बाजारात दाखल होत आहेत. बाजारात गुजरात तसेच कर्नाटक येथील जांभळांची आवक होत नसल्याने या जांभळांना 1 हजार 200 ते 1 हजार 700 रुपये भाव मिळत आहे. येत्या काळातही कोकणातील जांभळांची आवक कमीच राहणार असल्याचे व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले.