सोशल मीडियावरही जुनैदचे गौडबंगाल; बनावट अकाउंट, निधीबाबत कसून चौकशी

सोशल मीडियावरही जुनैदचे गौडबंगाल; बनावट अकाउंट, निधीबाबत कसून चौकशी
Published on
Updated on

महेंद्र कांबळे

पुणे : संशयित आरोपी मोहम्मद जुनैद मोहम्मद याने फेसबुकवर तयार केलेली पाच बनावट अकाउंट, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून ग्रुपवर केलेले चॅटिंगही संशयाच्या भोवर्‍यात अडकले आहे. त्या ग्रुपमधील अन्य सदस्यांबाबत, तसेच लष्कर-ए-तोयबा (एलईटी) संघटनेत भरती करण्याच्या अनुषंगाने पाठविण्यात आलेला निधी याबाबत त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याच्याकडील चौकशीत काही महत्त्वपूर्ण माहिती एटीएसच्या हाती लागल्याचे सूत्रांनी सांगितले.

भारतात घातपाताच्या कारवाया घडवून आणण्यासाठी, जातीय सलोखा धोक्यात आणण्यासाठी, तसेच धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी पुण्यातील तरुणाने बंदी असलेल्या एलईटी संघटनेत भरती केल्याचा धक्कादायक प्रकार दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) नुकताच उघड केला. या प्रकरणात तिघे फरारी असून, तिघेही जम्मू-काश्मीर येथील आहेत. तिघेही एलईटीशी संबंधित आहेत. 2021 ते एप्रिल 2022 दरम्यान फरारी असलेल्या जुनेदचा साथीदार याने एक अन्सर गझवात हिंद/तवाहीद नावाचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला होता.

त्या ग्रुपच्या माध्यमातून देशविरोधी पोस्ट व दहशतवादासंबंधी पोस्ट टाकून ग्रुपमधील इतर सदस्यांना उत्तेजित केले जात होते. त्याच ग्रुपमध्ये जुनैद हादेखील सहभागी असल्याचे एटीएसने केलेल्या तपासात समोर आले. त्या अनुषंगाने त्याच्याकडे तपास केला जात आहे. त्याचबरोबर तो सहा वेळा जम्मू-काश्मीरला गेला होता. तेथे तो नेमका कोठे आणि कोणाला भेटला याचीही माहिती त्याच्याकडून घेण्यात येत आहे. जुनैदच्या बँक खात्यांची पैशाच्या अनुषंगानेही एटीएस तपासणी करत आहे. जुनैदने फेसबुकवर वेगवेगळ्या नावांनी बनावट अकाउंट तयार केली असल्याचे निष्पन्न झाले.

त्याच्या दोन साथीदारांनी मिळून एलईटी संघटनेत भरती करण्यासाठी व त्यांना दारूगोळा व शस्त्रास्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण, भारतातील वेगवेगळ्या राज्यातील विविध गर्दीच्या ठिकाणी राष्ट्रीय सुरक्षिततेला बाधा येईल असे घातपाती व दहशतवादी कृत्य घडवून भारतातील धार्मिक ऐक्य आणि जातीय सलोखा धोक्यात आणून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार या निमित्ताने समोर आला. त्या ग्रुपच्या माध्यमातून पुण्यातील, महाराष्ट्रातील तसेच भारतातील किती संशयित यामध्ये सहभागी झाले याचाही तपास करण्यात येत आहे. याबाबत एटीएसच्या तपास अधिकारी पोलिस निरीक्षक मनीषा भोसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

या गोष्टींचाही तपास

'एलईटी' या संघटनेसाठी आर्थिक पुरवठा कोण करते़? नवीन भरती करून त्यांना कोठे पाठवले जाते? जुनैदने कोणाला प्रशिक्षणासाठी पाठवले का? देशातील कोणत्या ठिकाणांची रेकी करण्यात आली? घातपात व दहशतवादी कारवायासाठी शस्त्रास्त्र साठा आला आहे का? जिहादच्या नावाखाली त्या फरार दोन साथीदारांनी त्याचे ब्रेनवाॅश केल्याचे त्याने न्यायालयात सांगितले होते. नेमके हे दोघे त्याच्या संपर्कात कधी आले? त्यांना कशा पद्धतीने एलईटीच्या कामात ओढले ? याचाही जुनैदकडे तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news