RR vs RCB : राजस्थान जोशात फायनलमध्ये | पुढारी

RR vs RCB : राजस्थान जोशात फायनलमध्ये

अहमदाबाद ; वृत्तसंस्था : जोस बटलरच्या शानदार शतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बेेंगलोर (RR vs RCB) संघाला 7 विकेटस्नी हरवून आयपीएल 2022 च्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 157 धावा केल्या. राजस्थानने हे आव्हान 18.1 षटकांत पूर्ण केले. सलामीवीर बटलरने यंदाच्या आयपीएलमधील तिसरे शतक पूर्ण केले. एकाच हंगामात चार शतके करणारा बटलर हा विराट कोहली (2016) नंतर दुसरा खेळाडू बनला. त्याने 60 चेंडूंत 106 धावा करताना 10 चौकार आणि 6 षटकार ठोकले. राजस्थानचा अंतिम सामना आता रविवारी गुजरात टायटन्सविरुद्ध होणार असून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ पुन्हा एकदा विजेतेपद मिळवण्यास अपयशी ठरला आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर राजस्थान विरुद्धच्या क्वालिफायर-2 सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने 20 षटकांत 8 बाद 157 धावा केल्या आणि राजस्थान रॉयल्सला 158 धावांचे आव्हान दिले. बेंगलोरचा युवा फलंदाज रजत पाटीदार याने आजही दमदार अर्धशतक ठोकले. त्याने 58 धावा केल्या. त्याला कर्णधार डू प्लेसिस (25) आणि मॅक्सवेल (25) यांच्या व्यतिरिक्त कोणाचीही साथ न मिळाल्याने आरसीबीला आधीच्या सामन्यासारखी मोठी मजल मारता आली नाही. राजस्थानच्या गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख पार पाडल्यानंतर फलंदाजांनीही आपली जबाबदारी ओळखली. त्यांच्या यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर या जोडीने पहिल्या षटकापासूनच आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली. (RR vs RCB)

जैस्वालने मोहम्मद सिराजला पहिल्या षटकांत दोन षटकार आणि एक चौकार ठोकून 16 धावा वसूल केल्या. तिसर्‍या षटकांत बटलरने सिराजवर हल्‍ला चढवून 15 धावा चोपल्या. त्यानंतर शाहबाज अहमदच्या षटकांत 19 धावांची लूट करून फक्‍त 5 षटकांत 60 धावा संघाच्या खात्यात जोडल्या. शेवटी हेजलवूडने जैस्वालला विराटकरवी झेलबाद केले. त्याने 13 चेंडूंत 21 धावा केल्या, पण दुसर्‍या बाजूचा बटलर थांबण्यास तयार नव्हता.

हर्षल पटेलने संजू सॅमसनला (21) बाद केले. यावेळी मधल्या चार षटकांत धावगती मंदावली; परंतु आधीच्या धावगतीमुळे राजस्थानसाठी आवश्यक धावगती फारशी आवाक्याबाहेर नव्हती. 16 व्या षटकांत बटलरने पुन्हा गियर बदलला. पहिल्या तीन षटकांत 12 धावा देणार्‍या वानिंदू हसरंगाला त्याने दोन षटकार ठोकून विजयाकडे कूच केली. हेजलवूडने आपल्या शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर देवदत्त पडिक्‍कलला बाद केले, पण यावेळी राजस्थानला तीन षटकांत 10 धावा हव्या होत्या. (RR vs RCB)

तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून आरसीबीला फलंदाजी दिली. विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस दोघे सलामीला आले. विराटने एक षटकार लगावला, पण 7 धावांवर तो बाद झाला. त्यानंतर रजत पाटीदारच्या साथीने डू प्लेसिसने डाव पुढे नेला. डू प्लेसिसची संथ खेळी 27 चेंडूंत 25 धावांवर संपुष्टात आली. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि पाटीदारने तुफान फटकेबाजीला सुरुवात केली होती, पण मॅक्सवेल 13 चेंडूंत 24 धावांवर असताना झेलबाद झाला. रजत पाटीदारने गेल्या सामन्याप्रमाणेच या सामन्यातही दमदार खेळी केली. त्याने शानदार अर्धशतक ठोकले.

रजत पाटीदारने 42 चेंडूत 58 धावांची खेळी केली. त्यात 4 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. पाटीदार बाद झाल्यानंतर मात्र आरसीबीचा डाव गडगडला.

Back to top button