बंगळूर : कर्नाटकात बाराशे मुले राहतात रस्त्यावर | पुढारी

बंगळूर : कर्नाटकात बाराशे मुले राहतात रस्त्यावर

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा
गरिबी, आर्थिक संकट, दिव्यांग, कौटुंबिक छळ अशा विविध कारणांमुळे देशातील 17,914 मुले रस्त्यावर राहतात. या मुलांच्या नशिबी अनाथाश्रमही नाही आणि सरकारचा आश्रयही नसल्याचे उघडकीस आले आहे. अशी मुले महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, गुजरात, तमिळनाडू आणि आंध्रप्रदेशात सर्वाधिक असल्याची माहिती केंद्र सरकारने जाहीर केली आहे.

महाराष्ट्रात रस्त्यावर राहणार्या मुलांची संख्या 4952 आहे. हा सर्वाधिक आकडा आहे. या बाबतीत कर्नाटक (1206 मुले) सहाव्या स्थानी आहे. त्याआधी गुजरात (1990), तमिळनाडू (1703), दिल्ली (1653), मध्यप्रदेश (1492) या राज्यांचा क्रमांक आहे. दरवर्षी अशा मुलांची संख्या वाढत आहे. अशा मुलांच्या संगोपनासाठी आणि रक्षणासाठी पंचायतींपासून सरकारी पातळीवर जबाबदारी घेण्याची सूचना केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिली आहे.

रस्त्यावर फिरणार्या 17,914 मुलांपैकी 9,530 मुले आपल्या कुटुंबासमवेत मिळेल त्या ठिकाणी राहतात. 7,550 मुले सकाळपासून सायंकाळपर्यंत रस्त्यावर असतात. सायंकाळी आपल्या झोपडीकडे परततात. पण, 834 मुलांना कोणतेही कुटुंब नाही. ते अनाथांप्रमाणे राहतात. ते फूटपाथवर राहतात. ही आकडेवारी अधिकृत असून केंद्र सरकारने ती जाहीर केली आहे.

बस स्थानक, रेल्वे स्थानक, झोपडपट्टी, मंदिर, पडक्या इमारती, फूटपाथ, झोपडी, उद्यान अशा ठिकाणी ही मुले राहतात. रस्त्यावर राहणार्या मुलांची संख्या 17,914 आहे. पण, आई-वडिलांना गमावलेल्या किंवा त्यांच्यापासून दूर असणार्यांची संख्या 3 कोटी आहे. यापैकी काहीजण अनाथश्रमात राहतात. तर काहीजण घरामध्ये आणि काहीजण कारखान्यांमध्ये बालमजूर म्हणून राहतात. मुलींना अवैध व्यवसायात गुंतवले जाते. काही मुले गुन्हेगारीमध्ये अडकली असून बालसुधारगृहात आहेत.

रस्त्यावर येण्याचे कारण काय?

घरची गरिबी, दिव्यांग, स्थलांतर, कौटुंबिक छळ, एचआयव्ही रोग, आई-वडिलांचे अकाली निधन, निरक्षरता अशा विविध कारणांमुळे मुले रस्त्यावर येतात. त्यांना बघणारे कुणी नसते. त्यामुळे त्यांना रस्त्यावरच जीवन जगावे लागते.

Back to top button