तृतीयपंथीय म्हणतात आम्ही जायचे कुठे? ; शहरात स्वच्छतागृह नसल्याने गैरसोय | पुढारी

तृतीयपंथीय म्हणतात आम्ही जायचे कुठे? ; शहरात स्वच्छतागृह नसल्याने गैरसोय

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

पिंपरी चिंचवड शहरात तृतीयपंथीय वर्गाची संख्या जवळपास एक ते दीड हजारच्या आसपास आहे. बहुतांश तृतीयपंथवर्ग हा झोपडपट्टीसारख्या भागात राहत आहे. तसेच नोकरीची सोय नसल्याने रस्त्यावर सिग्नलवर भटकंती करुन यांना वर्गास पोट भरावे लागते. अशावेळी यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याने त्यांची कुंचबना होत आहे. त्यामुळे आम्ही जायचे कुठे ? असा प्रश्न तृतीयपंथीय विचारत आहेत.

सन 2014 मध्ये तृतीयपंथी हे तिसरे जेंडरचे अस्तित्व सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले व तृतीयपंथी नागरिकांसाठी राज्य व केंद्र सरकारला पुरुष, महिलांप्रमाणेच तृतीयपंथी नागरिकांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्याचे आदेश दिले. मात्र, आठ वर्षात सरकारने तृतीयपंथीसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधलेच नाही.

यानंतर केंद्र सरकारने सन 2019 ला तृतीयपंथीांच्या न्याय, हक्क व संरक्षणासाठी कायदा केला ज्यात पालिका, नगरपालिका याना अप्रोप्रियेट अ‍ॅथोरिटी घोषित केले व त्यांच्यावर तृतीयपंथीयांची जबाबदारी सोपवली. मात्र, पालिकेने तृतीयपंथींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधलेच नाहीत. परिणामी तृतीयपंथींना पुरुषांच्या स्वच्छतागृहामध्ये जावे लागते व तिथे त्यांच्यावर मानसिक व शारीरिक अत्याचार होत आहे.

बहुतांश वर्ग हा झोपडपट्टीमध्ये राहत असल्याने याठिकाणी सार्वजनिक स्वच्छागृहाशिवाय पर्याय नसतो. या सार्वजनिक स्वच्छतागृहात महिला आणि पुरुष असे वेगवेगळे पर्याय असतात. पण तृतीयपंथीयांना आत्तापर्यंत कोणताच पर्याय नसल्याने नाईलाजास्तव पुरूष स्वच्छतागृहाचा वापर करावा लागत आहे.

महिलांच्या स्वच्छतागृहाचा वापर केल्यास महिलांचा अप्रत्यक्षपणे विरोध होतो. त्यामुळे तृतीयपंथीयांच्या वाट्याला आतापर्यंत फक्त कुचंबनाच येत आहे. तृतीयपंथीयांसाठी 2019 रोजी कायदा करण्यात आला आहे. या कायद्यात स्पष्ट म्हटले आहे. या वर्गासाठी स्वच्छतागृह उपलब्ध करुन द्यावेत.

शहरातील तृतीयपंथीयांसाठी यावर्षी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी महापलिकेने बजेटमध्ये तरतूद केली आहे.

    – राजेश पाटील ( आयुक्त, महापालिका)

Back to top button