नाशिक : कारची काच फोडून 1 लाखाची रोकड केली लंपास | पुढारी

नाशिक : कारची काच फोडून 1 लाखाची रोकड केली लंपास

नाशिक (सिन्नर) : येथील उद्योग भवन परिसरात एका अपार्टमेंटच्या आवारात उभ्या असलेल्या कारची काच फोडून रोकड लंपास केल्याची घटना घडली. शहरातील उद्योग भवन परिसरात गुलमोहर अपार्टमेंट येथे राहात असलेले बांधकाम व्यावसायिक रवींद्र चंद्रभान गायकवाड (44) यांनी कामाचे 1 लाख 10 रुपये रोख आपल्या आय 20 कार (क्र. एमएच 15/ जीए 3588) च्या डॅशबोर्डच्या डिकीमध्ये ठेवले होते. सोमवारी (दि. 23) दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांनी कार अपार्टमेंटच्या आवारात उभी करून कामासाठी घरात गेले असता, चोरट्याने कारच्या दरवाजाची काच फोडून डॅशबोर्डच्या डिकीमध्ये असलेली 1 लाख 10 हजारांची रोकड घेऊन पोबारा केला.

गायकवाड हे 12.40 वाजता पुन्हा कारमध्ये आले असता, त्यांना कारची काच फोडलेली दिसली. त्यांनी डिकी उघडून बघितली असता, त्यातील रोकड लंपास झाल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ सिन्नर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीची तक्रार दाखल केली. चोरट्याने गायकवाड यांच्यावर पाळत ठेवून त्याचा पाठलाग करीत संधी मिळताच हात साफ केल्याचा संशय व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस नाईक चेतन मोरे अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button