पिंपरी :आरक्षणाची सोडत मंगळवारी: 139 पैकी 70 महिलांच्या जागा निश्चित होणार | पुढारी

पिंपरी :आरक्षणाची सोडत मंगळवारी: 139 पैकी 70 महिलांच्या जागा निश्चित होणार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) व सर्वसाधारण खुला गटातील (ओपन) जागेसाठी महिला आरक्षण सोडत येत्या मंगळवारी (दि.31) सकाळी अकराला चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात काढली जाणार आहे. एकूण 139 जागांपैकी महिलांच्या 70 जागा कोणत्या हे त्या दिवशी स्पष्ट होणार आहे. त्रिसदस्यीय 46 प्रभाग रचनेला 12 मे रोजी आयोगाची अंतिम मंजुरी मिळाली.

प्रभागरचना 13 मे रोजी प्रसिद्ध करण्यात आली. आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घेण्याच्या सूचना महापालिकेस सोमवारी (दि.23) प्राप्त झाल्या. त्यानुसार पुढील मंगळवारी सोडत काढली जाणार आहे. पारदर्शक काचेच्या भरणीत चिठ्ठया टाकून विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठी काढली जाईल. सोडतीचे छायाचित्रिकरण केले जाणार आहे.प्रथम एससीच्या एकूण 22 जागांपैकी महिलांसाठी 11 जागांची सोडत काढली जाणार आहे. त्यानंतर एसटीच्या एकूण 3 जागांपैकी महिलांच्या 2 जागांची सोडत निघेल. एससी व एसटीच्या एकूण 25 जागांच्या चिठ्ठया बाजूला ठेवल्या जातील.

उर्वरित 114 जागांतून सर्वसाधारण खुल्या गटातील महिलांच्या 57 जागांची चिठ्ठी काढली जाईल. त्यासाठी प्रथम प्रभागातील ‘अ’जागेवरील चिठ्ठया काढल्या जातील. त्यानंतर ‘ब’ जागेवरील चिठ्ठया निघतील. उर्वरित राहिलेल्या जागा या सर्वसाधारण खुला गटासाठी असतील.
मात्र, एका प्रभागात जास्तीत जास्त दोन महिलांच्या जागा आरक्षित असणार आहेत. एक प्रभागात सर्वच्या सर्व तीन महिलांचे आरक्षण काढले जाणार नाही. तिसरी जागा ही शिल्लक असलेल्या त्या-त्या गटाच्या खुल्या वर्गासाठी असेल. सांगवी प्रभाग क्रमांक 46 मध्ये चार जागा आहेत. त्यात दोनच जागा महिलांसाठी राखीव असतील, असे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

सोडत काढल्यानंतर हरकती व सूचना स्वीकारणार

सोडत काढल्यानंतर प्रभागाचे अंतिम आरक्षण यादी प्रसिद्ध केली जाते. त्यावर सूचना व हरकती स्वीकारल्या जात नाहीत. मात्र, यंदा प्रथमच आरक्षण सोडतीनंतर 1 ते 6 जून असे सहा दिवस सोडतीसंदर्भात हरकती व सूचना स्वीकारण्यात येणार आहेत. हरकती व सुचनांचा विचार करून 13 जूनला प्रभागनिहाय आरक्षण अंतिम करून ते प्रसिद्ध केले जाईल.

पिंपळे गुरवमधील प्रभाग 41 व 44 बाबत उत्सुकता

प्रभाग क्रमांक 41 व 44 मध्ये एससी व एसटी असे दोन्ही जागेचे आरक्षण आहे. त्यामुळे तिसरी जागा खुली राहणार की महिला आरक्षण पडणार उत्सुकता आहे. एससी व एसटी दोन्ही जागा महिलांसाठी राखीव झाल्यास तिसरी जागा ही खुली असेल. एससी व एसटीपैकी एक जागा महिलेस गेल्यास तिसर्‍या जागेवर महिला आरक्षण असेल, असेही स्पष्ट करण्यात आले.

सविस्तर कार्यक्रम शुक्रवारी जाहीर करणार

आरक्षण सोडत चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात काढली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या नियमानुसार कार्यक्रम आखला जाणार आहे. शुक्रवारी (दि.27) सविस्तर कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे, असे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले.

Back to top button