शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा; ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या सभेप्रसंगी 21 तक्रारी | पुढारी

शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा; ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या सभेप्रसंगी 21 तक्रारी

पिंपरी : संत तुकारामनगर परिसरातील भटक्या व मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. ती कुत्री नागरिकांवर हल्ला करतात. त्यात नागरिक व लहान मुले जखमी होत आहेत. त्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी तक्रार कासारवाडीतील ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या जनसंवाद सभेत सोमवारी (दि.23) करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सहशहर अभियंता संजय कुलकर्णी होते. या वेळी क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात व सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मोकाट कुत्र्यांच्या त्रासाबद्दल प्यारेलाल लोहार यांनी तक्रार मांडली. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची तक्रार प्यारेलाल लोहार यांनी केली.

त्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना पशुवैद्यकीय विभागास देण्यात आल्या आहेत. संत तुकारामनगरातील बॅडमिंटन हॉलच्या परिसरात नियमितपणे साफसफाई केली जात नाही. कमी दाबाने पाणी येते, अशी तक्रार अ‍ॅड. मोहन अडसूळ यांनी केली. वल्लभनगर येथील पंडित दिनदयाल शाळेच्या परिसरात घंटागाडी येत नसल्याची तक्रार रवीराज मांडवे यांनी केली. चोवीस बाय सात पाणी योजनेचे काम पूर्ण करावे. परिसरातील झाड्याच्या धोकादायक फांद्या कापाव्यात, अशी तक्रार शेखबहादूर खत्री यांनी केली. वल्लभनगर एसटी आगारासमोरील मेट्रोच्या जागेत राडारोडा आणून टाकला जात असल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे. कर्नाटकच्या बसेस रस्त्यावर लावल्या जातात, अशी तक्रार दत्तात्रय निघोजकर यांनी केली.

ड्रेनेज लाइनबाबत तक्रारी

दापोडीतील रोंदाळे चाळ परिसरात नियमितपणे साफसफाई केली जात नसल्याने अस्वच्छता पसरली आहे, अशी तक्रार अक्षय गायकवाड यांनी केली. बॉम्बे कॉलनी येथील ड्रेनेज लाइनची सफाई करावी, अशी तक्रार संतोष तापडीया यांनी केली. कर्नावट चाळीतील ड्रेनेज समस्या दूर करण्याची तक्रार नीलेश आवळे यांनी केली. बॉम्बे कॉलनी व सुंदरबाग कॉलनीतील रस्त्याबाबत तुषार नवले यांनी पुन्हा तक्रार मांडली.

कासारवाडीतील विविध समस्या

कासारवाडीतील रामराज्य सोसायटीजवळील लांडे चाळ येथील ड्रेनेज लाइन तुंबल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे, अशी तक्रार विदा लांडे यांनी केली. कुंदननगर परिसरातील पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील पदपथ दुरूस्त करावेत. पथदिवे बसवावेत, कुणाल पूरम सोसायटीमागील नाला स्वच्छ करावा. परिसरातील खड्डे पावसाळ्यापूर्वी दुरूस्त करावेत. परिसरात ओपन जीमचे साहित्य बसवावे, अशी तक्रार देवदत्त लांडे यांनी केली.

हनुमान कॉलनी येथील झाड्याच्या धोकादायक फांद्या छाटण्याची तक्रार ओंकार लांडगे यांनी केली. क्षेत्रीय कार्यालयाच्या रस्त्यावर वाहने अनधिकृतपणे पार्क केले जात असल्याने वाहतुकीस अडथळा होतो, अशी तक्रार मझहर शेख यांनी केली. उर्दू शाळेशेजारील झाड्याचा धोकादायक फांद्या छाटण्याची मागणी त्यांनी केली. हनुमान मंदिर ते नाशिक फाटा रस्त्यावर दुभाजक काढून टाकण्याची मागणी प्रणव लांडगे यांनी केली.

सांगवीत कमी दाबाने पाणीपुरवठा

सांगवी परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. नाईलास्तव नागरिकांना पाण्याचा टँकर विकत घ्यावा लागत आहे, अशी तक्रार कुंदन कसबे यांनी केली. नवी सांगवीतील चैत्रबन सोसायटी येथील काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण करण्याची तक्रार सुरेश शिंदे यांनी केली.

Back to top button