

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि महिला आरक्षणाची सोडत येत्या मंगळवारी (दि.31) काढली जाणार आहे. एकूण 139 जागेपैकी एससीच्या 22 जागा, एसटीच्या 3 जागा आणि महिलांसाठी एकूण 70 जागेचे आरक्षण ठरणार आहे. ही सोडत इतर मागासवर्ग (ओबीसी) शिवाय असणार आहे. सोडतीनंतर प्रत्येक प्रभागातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी (दि.23) आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार महापालिकेच्या वतीने कार्यवाही केली जात आहे. आयोगाकडून 12 मे रोजी प्रभाग रचनेला अंतिम मंजुरी मिळाली. अंतिम प्रभागरचना 13 मे रोजी प्रसिद्ध करण्यात आली.
त्रिसदस्यीय प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाकडे नगरसेवक, इच्छुकांचे लक्ष लागले होते. येत्या मंगळवारी आरक्षण सोडत होणार आहे. पालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या नियंत्रणाखाली सोडतीबाबत तयारी व संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. येत्या शुक्रवारी (दि.27) आरक्षण सोडतीबाबत जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात येईल. पुढील मंगळवारी आरक्षित जागा निश्चितीसाठी सोडत काढण्यात येणार आहे. बुधवारी (दि.1 जून) आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध केले जाईल. त्यांनतर 1 ते 6 जूनपर्यंत सोडतीवर हरकती व सूचना स्वीकारल्या जातील. 13 जूनला अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल.
पालिकेची नगरसेवक संख्या 139 असून, तीन सदस्यांचे 45 आणि चार सदस्यांचा एक असे एकूण 46 प्रभाग आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार आरक्षण निश्चिती केले जाते. ओबीसी आरक्षण नसल्यामुळे सद्यस्थितीत एससी, एसटी आणि महिला आरक्षित जागांसाठी सोडत काढली जाणार आहे. एससीसाठी 16 टक्के आरक्षण असून त्यांच्यासाठी 22 प्रभागात 22 जागा आरक्षित असणार आहेत. त्यामध्ये 11 जागा महिलांसाठी आरक्षित असतील. एसटीसाठी लोकसंख्येवर तीन टक्के आरक्षण असून त्यांच्या तीन जागा राखीव असणार आहेत. त्यापैकी दोन जागा महिलांसाठी असणार आहेत. सर्व 139 पैकी 70 जागा महिलांसाठी राखीव असतील. ओबीसी आरक्षण नसल्याने 114 जागांवर खुल्या वर्गातील महिला व पुरुष उमेदवार असतील. तर, पुरुषांसाठी एकूण 69 जागा असणार आहेत.
आरक्षण सोडतीनंतर पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतील सर्व 46 प्रभागातील चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षासह अपक्ष उमेदवारांची नावे निश्चित होतील. त्यामुळे प्रत्येक जागेवरील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. तेंव्हापासून प्रभाग मोर्चबांधणीस अधिक वेग येणार आहे.
एससीचे आरक्षण असलेले प्रभाग क्रमांक : 29, 19, 20,22,43,11,37,18,24,34,16,35,17,44,39,32,46,41,14,2,25,38.
एसटीचे आरक्षण असलेले प्रभाग क्रमांक : 41,6,44