भिकार्‍याने पत्नीला दिली मोपेडची भेट | पुढारी

भिकार्‍याने पत्नीला दिली मोपेडची भेट

भोपाळ ः पती-पत्नीचे प्रेम आणि एकमेकांना भेटवस्तू देणं ही काही नवलाईची बाब नाही. मात्र, मध्य प्रदेशातील अशाच एका भेटीची सध्या चर्चा होत आहे. छिंदवाडा जिल्ह्यातील एका भिकार्‍याने भिकेतून मिळवलेल्या पैशांमधून पत्नीला चक्‍क मोपेडची भेट दिली आहे. आता हे दोघे याच मोपेडवर बसून भीक मागण्यासाठी जातात!

या भिकार्‍याचे नाव आहे संतोष साहू. तो व त्याची पत्नी मुन्‍नी साहू हे छिंदवाडा जिल्ह्यातील अमरवाडा येथील रहिवासी आहेत. संतोष हा दिव्यांग असून तो ट्रायसायकलवर बसून फिरत असे व या सायकलीला त्याची पत्नी धक्‍का देत असे. अनेक वेळा खराब रस्त्यामुळे पत्नी मुन्‍नाबाईला ट्रायसायकल ढकलणे कठीण होत असे. बायकोला होणारा हा त्रास संतोषला पाहवत नव्हता. अनेक वेळा त्याची पत्नी आजारीही पडत असे व उपचारासाठी पैसे खर्च होत असत.

अखेर एक दिवस मुन्‍नाबाईने पतीला मोपेड खरेदी करण्याचा सल्‍ला दिला. संतोषनेही कोणत्याही परिस्थितीत पत्नीसाठी मोपेड खरेदी करण्याचे ठरवले. दोघेही बसस्थानक, मंदिर व दर्ग्याजवळ जाऊन भीक मागायचे आणि त्यांची रोजची कमाई सुमारे तीनशे ते चारशे रुपये इतकी आहे. पै-पै जोडून दोघांनी चार वर्षांत 90 हजार रुपये जमा केले व ही रोख रक्‍कम देऊन नुकतीच नवी मोपेड खरेदी केली. अशाप्रकारे संतोषने पत्नीचे स्वप्न पूर्ण केले.

Back to top button