फिटनेस नसल्यामुळेच वाहनांचा अपघात; वर्षभरात 18 हजार वाहनांवर कारवाई | पुढारी

फिटनेस नसल्यामुळेच वाहनांचा अपघात; वर्षभरात 18 हजार वाहनांवर कारवाई

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुणे आरटीओने गेल्या वर्षभरात 18 हजार 95 वाहनांवर कारवाई केली. त्यापैकी 6 हजार 272 वाहनांवर फिटनेस तपासणी नसल्यामुळे कारवाई करण्यात आली. यात इतर नियमभंगापेक्षा फिटनेस तपासणी नसणार्‍याच वाहनांची संख्या जास्त आहे. यावरून पुणेकर वाहनचालक आपल्या वाहनाची वेळेत फिटनेस तपासणी करत नसल्याचे दिसत असून, यामुळेच की काय, रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, असा प्रश्न वाहतूक तज्ञांना पडला आहे.

पुणे शहरात 43 लाखांपेक्षा अधिक वाहने आहेत. या सर्व वाहनांकडून नियमांचे व्यवस्थितरित्या पालन व्हावे आणि शहरातील वाहतूक सुरळीत चालावी, याकरिता आरटीओकडून वायुवेग पथकाच्या सहाय्याने कारवाई केली जाते. 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत आरटीओने पुणे शहरात 18 हजार 95 वाहनांवर कारवाई केली. त्यातून आरटीओला 7 कोटी 82 लाख 45 हजार रूपयांचा महसूल मिळाला आहे.

इन्शुरन्स नसलेल्या वाहनांनवरही सर्वाधिक कारवाई

आरटीओकडून मोटार वाहन कायद्यानुसार विविध नियमाअंतर्गत वाहनांवर कारवाई केली जाते. 2021 ते 2022 या आर्थिक वर्षात आरटीओने फिटनेस नसलेल्या वाहनांसोबतच इन्शुरन्स नसलेल्या वाहनांवर सुध्दा मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे. यात 6 हजार 274 वाहनांकडे इन्शुरन्स नसल्याने वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून आरटीओला 72 लाख 39 हजारांचा महसूल मिळाला.

या नियमभंगाखाली झाल्या कारवाया

नियम प्रकार – कारवाई केलेली वाहनसंख्या – त्यातून मिळालेला महसूल
– वाहनाचा फिटनेस नाही – 6 हजार 272 वाहने – 2 कोटी 76 लाख 86 हजार रूपये
– इन्शुरन्स नाही – 6 हजार 274 वाहने – 72 लाख 39 हजार रूपये
– ओव्हरलोड(मालवाहतूक) – 1 हजार 618 वाहने – 3 कोटी 58 लाख 27 हजार रूपये
– सेफ्टी बेल्ट नाही – 133 वाहने – 27 हजार रूपये
– वाहनाला रिफ्लेक्टर नाही – 1 हजार 495 वाहने – 13 लाख 27 हजार रूपये
– ओव्हरलोड(पॅसेंजर) – 11 वाहने – 4 लाख 38 हजार रूपये
– हेल्मेट नाही – 387 वाहने – 1 लाख 93 हजार रूपये
– हॉर्न नाही – 84 वाहने – 42 हजार रूपये
– वाहनातून प्राण्यांची वाहतूक – 10 वाहने – 89 हजार रूपये
– वाहनाच्या छतावर मालवाहतूक करणे – 46 वाहने – 5 लाख 89 हजार रूपये

शहरातील वाहनांची संख्या

  • पुणे शहर            – 43 लाख 7 हजार 831 वाहने
  • पिंपरी-चिंचवड     – 22 लाख 10 हजार 142 वाहने
  • अकलूज             – 3 लाख 64 हजार 809 वाहने
  • संपूर्ण पुणे विभाग एकूण – 68 लाख 82 हजार 782

हेही वाचा :

Back to top button