पुणे विभागात दीड लाख घरांना मिळणार पाणी; महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा पुढाकार! | पुढारी

पुणे विभागात दीड लाख घरांना मिळणार पाणी; महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा पुढाकार!

शिवाजी शिंदे

पुणे : केंद्र शासनाच्या जलजीवन मिशनअंतर्गत पुणे विभागातील सुमारे 1 लाख 44 हजार घरांना पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र नळजोडणी मिळणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण लवकरच कामे सुरू करणार असून, हा प्रकल्प 2024 पर्यंत पूर्ण होणार आहे. इतर जिल्ह्यांपेक्षा सर्वाधिक नळजोडणी पुणे जिल्ह्यात होणार असून, त्याची संख्या 89 हजार 671 एवढी आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पुणे विभागाअंतर्गत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांतील ग्रामीण भागात राहणार्‍या नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी केंद्र शासनाच्या जलजीवन मिशनअंतर्गत मागील काही वर्षांपासून नळजोडणी योजना सुरू करण्यात आली आहे.

त्यासाठी काही निधी थेट केंद्राद्वारे मिळत असतो. त्या अनुषंगाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून नळजोडणी प्रकल्प राबिण्यात येणार आहे. त्यानुसार या प्राधिकरणास 2 हजार 211 कोटी रुपयांच्या 101 योजना करण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 91 योजनांची कामे लवकरच सुरू होणार आहेत. त्यासाठी 1 हजार 745 कोटींच्या निधीला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. उर्वरित 10 योजनांची निविदा प्रशासकीय स्तरावर प्रगतीत आहे. या योजनेमुळे पुणे विभागातील ग्रामीण भागात राहत असलेल्या नागरिकांना प्रत्येकी दोन नळजोड मिळणार आहेत.

विभागातील नळजोडणी मिळणारे जिल्हे व संख्या

जिल्हा                        नळजोडणी
पुणे                             89,671
सातारा                        25,440
सांगली                        16,059
सोलापूर                       4932
कोल्हापूर                      8410

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मुख्य अभियंतापदाची धुरा हाती घेतल्यानंतर प्रशासकीय पातळीवर अनेक बदल करण्यात आले. नळ पाणी योजनांत अडथळा ठरणार्‍या बाबी विशेषत: राज्य दर सूची अद्ययावत करणे, भाववाढ करण्याच्या निविदा कामामध्ये समावेश करणे यासाठी पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे ही कामे मार्गी लावण्यास मदत झाली.
– राजेंद्र रहाणे, मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

हेही वाचा :

Back to top button