कंपनीच्या सर्व्हरमध्ये घुसून घातला 19 लाखाचा गंडा; चार जणांवर गुन्हा | पुढारी

कंपनीच्या सर्व्हरमध्ये घुसून घातला 19 लाखाचा गंडा; चार जणांवर गुन्हा

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुण्यातील एका कंपनीच्या सर्व्हर मध्ये अनधिकृतरित्या प्रवेश करुन चार जणांनी 18 लाख 88 हजार 320 रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. कंपनीच्या सर्व्हरसाठी नोड तयार करण्याचे काम दिले असताना चौघांनी ही फसवणूक केली आहे. सर्व्हर वरील हॉट वॉलेट मध्ये असणारे 23 हजार 604 डॉलर किंमत असलेले दोन लाख 34 हजार 134 क्रीप्टॉक्स टोकन (भारतीय चलनात 18 लाख 88 हजार रुपये) ऑनलाइन पध्दतीने दुसर्‍या खात्यात वळवून घेतल्याचे उघडकीस आले आहे.

आझम खान 27 महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर, तीन दिवसात मुख्यमंत्री योगींना भिडणार

याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात निनाद दिपक चांदोरकर (वय-29, रा. बावधन, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार व्हो थाईहाँग दीप (रा. व्हिएतनाम), वांग जुंग (ट्रान वन विन्हा) रा.व्हिएतनाम, नागुडेन खास तिन्हा (रा. व्हिएतनाम) व सुमा अख्तर (रा. बांग्लादेश) या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव : बनावट नोटांच्या कारखान्यावर धाड ; एकास अटक

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, निनाद चांदोरकर हे व्यवसायिक असून, व्हिएतनाम येथील वांग जुंग यांच्याकडे त्यांनी सर्व्हर साठीचे नोड तयार करण्याचे काम विश्वासाने दिले होते. मात्र, त्याने इतर साथीदारांच्या मदतीने दिलेल्या डेटा मधील कंपनीचे हॉट व्हॉलेटची प्रायव्हेट की व सर्व्हरवरचे इतर पासवर्ड गैर इराद्याने चोरुन त्याद्वारे कंपनीच्या सर्व्हरमध्ये अनाधिकृत प्रवेश केला. त्यानंतर संबंधित सर्व हॉट वॉलेट मधील एकूण 18 लाख 88 हजार रुपये किंमत आरोपींनी संगनमत करुन ऑनलाईन पध्दतीने स्वत:चे व साथीदारांच्या खात्यावर युएसडीटी टोकन मध्ये वळवुन तक्रारदार यांची फसवणुक केली आहे. याबाबत पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण करत आहे.

Back to top button