पुणे : पुढारी वृत्तसेवा
इंधन दरवाढीमुळे वाहतुकीत झालेली वाढ आणि अन्य सर्वच सेवा-सुविधांच्या दरात होत असलेल्या वाढीचा परिणाम साबूदाण्याच्या दरावर होताना दिसत आहे. मागील आठवड्यात साबूदाणा दरात प्रतिकिलोमागे तीन ते पाच रुपयांनी वाढ झाली आहे. इंधन दरवाढीमुळे वर्षाला दुसर्यांदा साबूदाण्याच्या दरात वाढ झाली आहे. देशातील तमिळनाडू राज्यात साबूदाण्याचे उत्पादन होते. तेथील उद्योगांकडून साबूदाणा विक्रीस पाठविला जातो. महाराष्ट्रातही तमिळनाडूतून साबूदाणा येतो. व्रतवैकल्यांचे महिने वगळता साबूदाण्याचे दर वर्षभर स्थिर असतात.
मात्र, मागील काही महिन्यांपासून इंधन दरात सातत्याने वाढ होत आहे. परिणामी, वाहतूक खर्च वाढला आहे. तसेच साबूदाणा उद्योगांच्या पायाभूत सुविधांच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे तमिळनाडूतील साबूदाणा उत्पादक तसेच प्रक्रिया करणार्या उद्योगांनी साबूदाणा दरात क्विंटलमागे 300 रुपयांनी वाढ केली आहे. परिणामी, किरकोळ बाजारात एक किलो साबूदाण्याच्या दरात तीन ते पाच रुपयांनी वाढ झाली आहे. वाहतूक खर्च, उत्पादन खर्च वाढल्याने साबूदाणा दरात वाढ केल्याचे व्यापारी अशोक लोढा यांनी सांगितले.
किरकोळ बाजारातील साबूदाण्याचे किलोचे दर
मध्यम प्रत 48 ते 52 रुपये किलो
उच्च प्रत 52 ते 54 रुपये किलो
राज्यात श्रावण, भाद्रपद, आश्विन या तीन महिन्यांत साबूदाण्याला मोठी मागणी असते. या काळात साबूदाण्याचे दर तेजीत असतात. त्यानंतर साबूदाण्याचे दर स्थिर असतात. साबूदाणा उत्पादकांनी दरवाढ करण्याचा निर्णय घेतल्याने यापुढील काळात साबूदाण्याचे दर तेजीत राहतील.
– आशिष दुगड, साबूदाण्याचे व्यापारी
हेही वाचा :