मुंबई : राज्यसभेच्या दुसर्‍या जागेसाठी भाजपमध्ये चुरस | पुढारी

मुंबई : राज्यसभेच्या दुसर्‍या जागेसाठी भाजपमध्ये चुरस

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : भाजपमध्ये दुसर्‍या जागेसाठी मोठी चुरस असून भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे, मावळते खासदार विनय सहस्रबुद्धे आणि कृपाशंकर सिंह यांची नावे आघाडीवर आहेत. दरम्यान विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी दिल्लीत असून त्यांनी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. फडणवीस यांचे वजन कोणाच्या पारड्यात पडते, त्याचा राज्यसभेचा मार्ग सुकर होणार आहे.

राज्यसभेच्या विधानसभा सदस्यांमधून निवडून द्यायच्या 6 जागांसाठी 10 जूनला निवडणूक होणार आहे. भाजप आमदारांचे संख्याबळ पाहता भाजपच्या दोन जागा सहज निवडून जाणार आहेत. त्यापैकी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची वर्णी पक्की आहे. मात्र दुसर्‍या जागेसाठी चुरस आहे. मावळते खासदार विकास महात्मे यांचा पत्ता कापला जाणार आहे. मात्र, भाजपचे उपाध्यक्ष असलेल्या विनय सहस्रबुद्धे यांना दुसर्‍यांदा संधी मिळते की नाही, याबाबतही साशंकता आहे.

तावडे यांचे गेल्या विधानसभा निवडणुकीत तिकीट कापण्यात आले होते. त्यामुळे तावडे काहीसे बाजूला पडले होते. मात्र नंतर त्यांना राष्ट्रीय सरचिटणीसपद देत केंद्रात महत्त्वाचे स्थान देण्यात आले. आता त्यांना राज्यातून राज्यसभेतही पाठविले जाणार का? याबाबत भाजपमध्ये चर्चा आहे. तर मुंबई महापालिकेच्या निवडणुका पाहता उत्तर भारतीय व्होटबँक मजबूत करण्यासाठी कृपाशंकर सिंह यांना संधी देऊ शकतो. सिंह हे भाजपसाठी उत्तर प्रदेशमध्येही उपयुक्त ठरत आहेत.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस गुरुवारी दिल्लीत होते. यावेळी त्यांनी जे. पी. नड्डा यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. या भेटीत त्यांनी राज्यसभा निवडणुकीवर चर्चा केल्याचे समजते. जयपूरमध्ये भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक गुरुवारपासूनच सुरू झाली आहे.

या बैठकीसाठी फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील गेले आहेत. तेथेही राज्यसभा निवडणुकीवर चर्चा होऊ शकते. मात्र यापूर्वी अमर साबळे, डॉ. भागवत कराड अशी अनपेक्षित नावे राज्यसभेवर पाठवून भाजप श्रेष्ठींनी धक्कातंत्राचा अवलंब केला होता. यावेळीदेखील अशी शक्यता नाकारता येत नसल्याचे भाजपमध्ये बोलले जात आहे.

शिवसेना दोन जागा लढणार हे निश्चित झाल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. माजी खासदार चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ आदी नावे आता चर्चेत आली आहेत. महाविकास आघाडीत चौथी जागा शिवसेना लढेल यावर एकमत झाले असून ही जागा निवडून आणण्याएवढे संख्याबळ महाविकास आघाडीकडे आहे. छत्रपती संभाजी राजे यांनी अपक्ष म्हणून आपली उमेदवारी जाहीर केली आहे, पण ते जर शिवसेनेचे अधिकृत उमेदवार झाले नाहीत, तर पक्षातील नेत्यालाच संधी मिळू शकते.

Back to top button