‘एनएमएमएस’वर होणार ‘रोहयो’ मजुरांची हजेरी | पुढारी

‘एनएमएमएस’वर होणार ‘रोहयो’ मजुरांची हजेरी

पुणे : पुढारी वृत्तसेवा

‘मनरेगा’तील मजुरांच्या पैशावर डल्ला मारण्याच्या प्रकाराला लगाम लावून त्यांच्या कामाचे योग्य मानधन मिळण्यासाठी आता ‘नॅशनल मोबाईल मॉनिटरींग सॉफ्टवेअर’ (एनएमएमएस) हे अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर या प्रणालीची पूर्वचाचणी घेण्यात आली, ती यशस्वी ठरली, अशी माहिती रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारीडॉ. धनश्री लाभशेटवार यांनी दिली.
रोहयोचे काम सुरू असताना मजुरांकडून कामाची मागणी केली जाते. मात्र स्थानिक पातळीवर खोटी कागदपत्रे दाखवून निधी लाटण्याचा गैरफायदा घेण्याचे प्रकारदेखील घडले आहेत.

त्यामुळे मजुरांना काम मिळावे आणि त्या कामाचा मोबदला त्याच व्यक्तीच्या हातात जावा, जेणेकरून पारदर्शकता यावी म्हणून केंद्र सरकारने ही प्रणाली विकसित केली आहे, अशी माहिती डॉ. लाभशेटवार यांनी दिली. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील ज्या गावामध्ये रोहयोंतर्गत काम सुरू आहे, अशा 14 गावांची निवड करून 20 पेक्षा अधिक मजूर असणार्‍या ठिकाणी मोबाईलवर मजुरांची माहिती घेण्यात आली. तत्पूर्वी संबंधित ग्राम विकास अधिकारी, ग्रामरोजगार यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर एक महिनाभर ही पूर्वचाचणी करत मजुरांना त्यांचे नियमित मानधन अदा करण्यात आले.

काही ठिकाणी तांत्रिक बिघाडाव्यतिरिक्त त्रुटी निर्माण झाल्या नसल्याने या प्रणालीचा संपूर्ण जिल्ह्यात अवलंब करण्यात येणार असल्याचे डॉ. लाभशेटवार यांनी सांगितले. ‘एनएमएमएस प्रणाली’द्वारे मजुरांची उपस्थिती दर्शविण्यात येणार आहे. तत्पूर्वी मजुराने जॉबकार्डचा नंबर अ‍ॅपमध्ये संकलित करून त्याचे नाव, पत्ता, माहिती, कामाचे स्वरूप, कामाचे ठिकाण याची माहिती भरावी लागेल. त्यानंतर सकाळी 11 वाजता आणि दुपारी दोन ते पाच या वेळेत मजुराचे छायाचित्र आणि स्वाक्षरीसाठी देण्यात आलेला अंगठ्याचा ठसा ‘एनएमएमएस’ या अ‍ॅपद्वारे घेतला जात आहे.

हेही वाचा :

Back to top button