ओढ्या… तुला शोधू कुठं? लेंडी ओढ्याचे अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर | पुढारी

ओढ्या... तुला शोधू कुठं? लेंडी ओढ्याचे अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर

हिरा सरवदे

पुणे : नर्‍हे गावातून वाहणारा, पुढे मुठा नदीला मिळणारा आणि एकेकाळी पावसाचे पाणी वाहून नेणारा महत्त्वाचा मोठा ओढा…लेंडी ओढा आजची त्याची अवस्था काय आहे? काही ठिकाणी या ओढ्याचे रूपांतर पावसाळी लाइनमध्ये करून चक्क त्यावर रस्ता करण्यात आला आहे. त्याचे पात्र कुठे तीन फूट, तर कुठे पाच फुटांपर्यंत आक्रसले आहे. काही ठिकाणी ओढ्यावर नागरिकांनी स्लॅब टाकून त्यावर घरे बांधली आहेत, तर काही ठिकाणी भराव टाकून ओढ्याची जागा बळकाविण्यात आली आहे. त्यामुळेच हा ओढा अस्तित्वाची लढाई लढत असल्याचे दिसून येते.

Assam Floods | आसाममधील पूरस्थिती गंभीर, ९ जणांचा मृत्यू, ६.६२ लाख लोकांना फटका

नर्‍हे येथील स्वामिनारायण मंदिरापाठीमागे उगम पावणार्‍या लेंडी ओढ्याचे अस्तित्व कुठे दिसते, तर कुठे अजिबातच जाणवत नाही. ओढ्यात झालेली बांधकामे, टाकलेला राडारोडा आणि कचरा, यामुळे या ओढ्याची ही स्थिती झाली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईची कामे करणारी महापालिका लेंडी ओढ्यातील राडारोडा आणि अतिक्रमणे काढणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

महापालिका हद्दीत नव्याने समावेश झालेल्या नर्‍हेगावच्या हद्दीतून लेंडी ओढा आणि पिराचा ओढा वाहतो. लेंडी ओढ्याचा उगम स्वामिनारायण मंदिरामागे, तर पिराच्या ओढ्याचा उगम अंबाईदरा येथून होतो. या दोन्ही ओढ्यांचा संगम काशीबाई नवले हॉस्पिटलच्या मागील बाजूला शाहू बँकेजवळ होतो. हा ओढा वडगाव येथील स्मशानभूमी येथून पुढे मुठा नदीला मिळतो. लेंडीचा ओढा जरी स्वामिनारायण मंदिरापाठीमागे होत असला, तरी या ओढ्याचे अस्तित्व येथील जेएसपीएमएस महाविद्यालयाच्या सीमाभिंतीच्या बाहेरच दिसते. काही अंतरावर पुन्हा या ओढ्याचे रूपांतर पावसाळी लाइनमध्ये करून त्यावर रस्ता तयार करण्यात आला आहे.
पुढे ग्रीन व्हॅली सोसायटीच्या दारात थोडेसे ओढ्याचे अस्तित्व दिसते. पुढे वेताळबाबा चौकापर्यंत ओढा गायबच झालेला आहे. वेताळबाबा चौकातून पारी कंपनीकडे जाणार्‍या रस्त्यावर केवळ ओढ्यावरील कल्व्हर्टच दिसते. तिथून पुढे हा ओढा खाली मानाजीनगर येथून शाहू बँकेच्या मागे पिराच्या ओढ्याला मिळतो.

Bribes for visas case : कार्ती चिदंबरम यांनाही अटक होण्याची शक्यता

ओढ्याची साफसफाई कशी होणार?

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील ओढे व नाले साफसफाई करण्याचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. जेसीबी व इतर साधनसामग्रीच्या साहाय्याने राडारोडा व गाळ काढून पात्र मोठे करण्याचे काम केले जात आहे. मात्र, लेंडी ओढ्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने जेसीबी व इतर यंत्रसामग्री पात्रात पोहचू शकत नाही. पोहचलीच तर पात्र कमी झाल्याने काम करता येत नाही. त्यामुळे ओढ्यातील राडारोडा काढण्याचे काम महापालिका कशा पद्धतीने करणार की ग्रामपंचायतीसारखे दुर्लक्ष करणार, हे पाहावे लागणार आहे.

औरंगाबाद : गळा आवळून तरुणीचा खून; मित्र फरार

अनेक ठिकाणी बदललेले नैसर्गिक पात्र

शहरात ओढे आणि नाल्यांवर मोठ्या प्रमाणात बांधकामे करून अतिक्रमणे झाली आहेत. मात्र, लेंडी ओढ्यावर थोडे जास्तच अतिक्रमण झाल्याचे पाहायला मिळते. काही ठिकाणी मिळकतधारकांनी भराव टाकून ओढ्याची जागा बळकावली आहे. अनेक ठिकाणी इमारतींसाठी ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह वळविण्यात आला आहे. अशाप्रकारे अनेक ठिकाणी झालेल्या अतिक्रमणांमुळे ओढा आकुंचला आहे.

छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड जनतेची दिशाभूल करताय : आ. देवयानी फरांदे

अतिक्रमणांमुळे ओढ्याचे अस्तित्व धोक्यात

लेंडी ओढ्याच्या उगमापासून संगमापर्यंत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. जागा आणि घरांना मिळणार्‍या भरघोस किमतीमुळे अनेक ठिकाणी ओढ्याचे अस्तित्व ठेवलेले नाही. ज्या ठिकाणी अस्तित्व आहे, तेथे दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली आहेत. त्यामुळे या ओढ्याचे पात्र कुठे तीन फूट, तर कुठे पाच ते दहा फुटांपर्यंत आहे. त्यातच ओढ्यात मोठ्या प्रमाणात राडारोडा आणि कचरा टाकण्यात आला आहे. काही ठिकाणी ओढ्यावर स्लॅब आहे. लेंडी ओढ्यापेक्षा पिराच्या ओढ्याचे पात्र मोठे आहे. मात्र, या ओढ्यातही अनेक ठिकाणी इमारतींच्या सीमाभिंतींचे अतिक्रमण झाल्याचे पाहायला मिळते. याशिवाय ओढ्यात गाळासह मोठ्या प्रमाणात राडारोडा आणि कचर्‍याचे साम्राज्य आहे. त्यामुळे आजवर या ओढ्यांची साफसफाई कधी झाली आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होतो.

On The Spot : ही पहा ओढ्याची झालेली अवस्था छायाचित्रांच्या माध्यमातून

ओढ्यावर बांधलेला रस्ता
राडा-रोड्याने बुजत आलेला ओढा
अतिक्रमणामुळे निमुळता झालेला ओढा
इथे ओढा कुठे आहे ते शोधा…!
राडा-रोडा न काढल्याने रस्ता आणि ओढा एकाच पातळीत
इमारतीमुळे इथेही ओढा शोधावा लागतोय…!

Back to top button