विपरीत परिस्थितीवर मात करणारेच यशस्वी : डॉ. इंद्रजित देशमुख | पुढारी

विपरीत परिस्थितीवर मात करणारेच यशस्वी : डॉ. इंद्रजित देशमुख

पुणे : पुढारी वृत्तसेवा  डॉ. इंद्रजित देशमुख : गेल्या पावणेदोन वर्षांपासून कोरोनामुळे सर्वकाही बंद असून, या काळाने कमीत कमी गरजांमध्ये जगता येते, हे शिकविले.

त्यात भय, भीती, सामाजिक तिस्काराची भावना होतीच, तर दुसर्‍या बाजूला माणुसकीही होती.

अशा विपरीत परिस्थितीवर मात करणारेच आयुष्यात यशस्वी होऊ शकतात, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी डॉ. इंद्रजित देशमुख यांनी केले.

संजय घोडावत प्रस्तुत आणि दै. ’पुढारी’ आयोजित ’एज्यु-दिशा’ या लाइव्ह वेबिनारमध्ये ’आताच्या काळात स्वत:ला मोटिव्हेटेड कसे ठेवावे’

या विषयावर सांगली जिल्ह्यातील विटा येथील स्व. हणमंतराव पाटील ट्रस्ट संचलित आदर्श महाविद्यालयातून डॉ. इंद्रजित देशमुख व्याख्यान देत होते.

सुरुवातीला डॉ. देशमुख यांचे स्वागत ट्रस्टचे अध्यक्ष वैभव पाटील आणि आदर्शचे प्राचार्य भाऊसाहेब कोरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. दत्ता पाटील यांनी केले.

डॉ. देशमुख म्हणाले, गेल्या दोन वर्षांत आपण सर्वजण अभूतपूर्व परिस्थितीतून जात आहोत. सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, मान, पदाच्या मागे धावणारे जग कोरोनामुळे पूर्णत: थांबले आहे.

जगायला काय लागते, याचाही अनुभव आला आहे. दोन बर्मोडा आणि टी- शर्टवर जगता येतो, हे सध्याच्या परिस्थितीतून समोर आले आहे.

माहितीचा भांडार उपलब्ध होत असून, या माहितीचे रूपांतर ज्ञानात झाले पाहिजे. परंतु, येणार्‍या माहितीपैकी खरी माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे, हे शिक्षकांपुढे मोठे आव्हान आहे.

मोटिव्हेशनवर जागतिक लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांतील उदाहरणे देत देशमुख यांनी मार्गदर्शन केले. आपण जन्माला का आलो, हे कळते.

पण, कसे जगायचे, हे कळत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे प्रेरणा घेतलेली नसते. ध्येयनिश्?चितीसाठी परिश्रम आणि जगातील चांगल्या म्हणजेच प्रेरणादायी व्यक्तींचा सहवास लाभणे आवश्यक आहे.

ज्यांना का जगायचे, कसे जगायचे हे कळले, की आयुष्याचा मार्ग सुकर होतो.

सकारात्मकता यशाचा पाया…

पराक्रम घडविण्यासाठी येणार्‍या अडचणींवर लक्ष असेल, तरच यश मिळू शकते. जी व्यक्ती विपरीत परिस्थितीत स्वतःला सिद्ध करू शकते, तीच आयुष्यात यशस्वी होते.

त्यासाठी सकारात्मकता आवश्यक आहे. पराभवाकडून यशाकडे जाताना स्वतःमध्ये बदल घडविले, तरच यश मिळेल, असा मोलाचा सल्ला डॉ. देशमुख यांनी दिला.

मोटिव्हेशन म्हणजे काय?

शेवटच्या क्षणापर्यंत पुरुषार्थ जागा ठेवणे, मिळालेल्या क्षणांचा योग्य विनियोग करणे, असलेल्या परिस्थितीला प्रतिक्रिया न देता प्रतिसाद देणे, म्हणजेच प्रेरणादायी.

तसेच प्रतिक्रियावादी न होता प्रतिसादवादी होणे म्हणजेच प्रेरणादायी होय, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.

Back to top button