पालिकेच्या वतीने आपत्कालीन व्यवस्थापनासाठी ‘कंट्रोल सेंटर’ | पुढारी

पालिकेच्या वतीने आपत्कालीन व्यवस्थापनासाठी ‘कंट्रोल सेंटर’

पुणे; पुढारी वृत्तसेवा :
शहराच्या नियोजनासोबतच आपत्कालीन व्यवस्थापनासाठी महापालिकेच्या वतीने ‘इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर’ (आयसीसीसी) सेल स्थापन करण्यात येणार आहे. या सेलच्या प्रमुखपदी उपायुक्त प्रतिभा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या माध्यमातून महापालिकेच्या सर्व विभागांसह पीएमपीएमएल, पोलिस आणि स्मार्ट सिटी कंपनीमध्ये समन्वय राखून कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचे नियोजन आहे. महापालिकेच्या पथ विभागासह मलनिस्सारण देखभाल व दुरूस्ती विभाग, विद्युत विभाग, अतिक्रमण विभाग, पाणीपुरवठा, सुरक्षा, वृक्ष व उद्यान विभाग, आरोग्य विभाग आणि घन कचरा विभागाच्या वतीने शहरात नवीन विकासकामे व देखभाल दुरुस्तीची कामे केली जातात..
ही कामे वेगवेगळी दिसत असली तरी सर्वच विभाग जोडलेले असतात. उदा. मलनिस्सारण विभागाचे काम करायचे झाल्यास पाणीपुरवठा, विद्युत विभाग आणि पथ विभागाचा सहभाग असावा लागतो. ही कामे करताना वाहतूकही विस्कळीत होत असल्याने वाहतूक पोलिसांचीदेखील मदत गरजेची असते. या पार्श्वभूमीवर सर्व विभागांमध्ये समन्वय राखण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी महापालिकेच्या सर्व विभागांसह स्मार्ट सिटी, पोलिस, अग्निशामक दल आणि पीएमपीएमएल अशा विभागांचे एकत्रित इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी सर्व विभागांची एकत्रित संगणक प्रणाली विकसित केली जाणार आहे. या सेलच्या माध्यमातून कामकाजावर नियंत्रण ठेवणे, सर्व विभागांचा समन्वय साधणे व वेळेवर कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन  केले जाणार आहे. या सेलच्या मुख्य नोडल ऑफिसर म्हणून भूसंपादन व माहिती तंत्रज्ञान प्रमुख उपायुक्त प्रतिभा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सेलचा आपत्ती व्यवस्थापनाच्यावेळी वापर करण्यात येणार आहे. यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने यांची सहायक नोडल ऑफिसर म्हणून तर कनिष्ठ अभियंता ज्ञानेश्वर सोनवलकर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा :

Back to top button