

सुनील जगताप
पुणे : सिंहगड किल्ल्यावर जाण्यासाठी टोल आकारला जात होता. या टोलच्या माध्यमातून केवळ सहा महिन्यांमध्ये वनविभागाला तब्बल 69 लाख 42 हजार 450 रुपयांचा महसूल मिळाला असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकार्यांनी दिली.
कोरोनानंतर दि. 12 ऑक्टोबर 2021 पासून पर्यटकांना किल्ल्यावर जाण्याची परवानगी देण्यात आली. ही परवानगी देत असताना टोलच्या दरात वाढ करताना दुचाकीसाठी 50 रुपये तर चारचाकीसाठी 100 रुपयांचा टोल आकारण्यात आला. ऑक्टोबर 2021 ते मार्च 2022 या सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये वन विभागाला तब्बल 69 लाख 42 हजार 450 रुपयांचा टोलमधून महसूल मिळाला आहे.
चारचाकी वाहनांपासून 35 लाख 14 हजार 100 रुपये तर दुचाकीस्वारांकडून 34 लाख 28 हजार 350 रुपये एवढा महसूल मिळाला आहे. या टोल महसुलात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांमध्ये वाढ झाली असून सर्वात कमी टोल ऑक्टोबर 2021 मध्ये मिळाला आहे. वनविभाग आणि पीएमपीएमएलच्या वतीने 1 मेपासून इलेक्ट्रिक बससेवा सुरू केली असून, खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे 1 मेपासून टोल बंद आहे.
गडावरील नियोजनासाठी वनविभागाच्या वनसंरक्षण समितीअंतर्गत हा टोल घेतला जात होता. सहा महिन्यांमध्ये तब्बल 69 लाखांहून अधिक महसूल मिळाला होता. परंतु, सिंहगड पायथा, घाट रस्ता किंवा किल्ल्यावर तब्बल 31 व्यक्तींची नियोजनासाठी नियुक्ती केली होती. तसेच विविध उपक्रम किल्ल्यावर राबविले जातात. या सर्वांचा खर्च या टोल महसुलामधूनच केला जात होता.
– भाऊसाहेब लटके, वन परिमंडळ अधिकारी, खानापूर, सिंहगड