पुणे : संभाजी भिडे यांना कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी क्लिनचीट | पुढारी

पुणे : संभाजी भिडे यांना कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी क्लिनचीट

पुणे , पुढारी वृत्तसेवा : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर विनायक कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांना भीमा दंगल प्रकरणी क्लिनचीट मिळाली आहे. भिडे यांच्या विरोधात पुरेसे पुरावे न आढळल्याने त्यांचे नाव भीमा-कोरेगाव दंगलीच्या खटल्यातून वगळण्यात आल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी राज्य मानवी हक्क आयोगाला दिली. त्यामुळे संभाजी भिडे यांना क्लिनचीट मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोरेगाव भीमा दंगलीमध्ये संभाजी भिडे यांचा हात असल्याची तक्रार शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली होती. या प्रकरणात 41 आरोपींवर वर्षभर पूर्वीच आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये संभाजी भिडे यांचे नाव नसल्याची माहिती पोलिसांनी राज्य मानवी हक्क आयोगासमोर असलेल्या सुनावणीदरम्यान दिली. ठाण्यातील अ‍ॅड. आदित्य मिश्रा यांनी संभाजी भिडे यांच्याशी संबंधित प्रकरणाची सुनावणी होत नसल्याचे सांगत त्यातून यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार आयोगाकडे केली होती.

त्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान संभाजी भिडे यांचा भीमा कोरेगाव दंगल प्रत्यक्ष संबंध आढळून येत नसल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांचे नाव खटल्यातून वगळण्यात आल्याचे लेखी अहवाल दिला आहे. 1 जानेवारी 2018 ला कोरेगाव भीमा या ठिकाणी झालेल्या हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडेंचा हात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केल्यानंतर तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने संभाजी भिडेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

मिलिंद एकबोटेंसह 41 जणांवर आरोपत्र

मिलिंद एकबोटे, गणेश फडतरे, नितीन गव्हाणे, जितेंद्र गव्हाणे, विशाल फडतरे, ऋषिकेश गव्हाणे, गणेश साळवे, विलास इंगळे, जयदीप सकट, सिध्दार्थ गवदे, गणेश शेवाळे, राहुल सुरवसे, भुषण गायकवाड, प्रशांत ढसाळ, आकाश दंडवते, अक्षय रोकडे, राज धिवर, सिध्दार्थ धिवर, विजय शिवले, नान्या फडतरे, अभिषेक सव्वासे, प्रविण गव्हाणे, निखिल गव्हाणे,सचिन घावटे, अक्षय फडतरे, परशुराम गव्हाणे, किरण गव्हाणे, निखील दौंडकर, रवी सैद, सागर गहाणे, प्रशांत सुतार, महेश काशीद, अमोल गव्हाणे, मारूती ढेरंगे, जगदीश खैरे, बली भांडवलकर, महेश गायकवाड, संग्राम ढेरंगे, ओकांर ढेरंगे, हरीश शेळके, सचिन भंडारी

या कलमानुसार गुन्हा दाखल

भारतीय दंडसंहिता कलम 117, 120 ब, 143, 147, 149, 153 अ, 295 अ, 307, 436, आर्म अ‍ॅक्ट 4 (25), अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 कलम 6. सुधारणा कायदा 2015 कलम 3(1), आर, टि, यु, 2 (2) (5)(5-अ), महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 135 अशी कलमे आहेत.

या प्रकरणात दोषारोपपत्र वर्षभरापूर्वी दाखल करण्यात आले होता. या गुन्ह्यात पोलिसांनी साक्षीदार तपासल्यानंतर त्यांच्या विरूध्द कोणतेही पुरावे मिळाले नाही. तसेच त्यांचा सहभागही मिळून आला नाही. गुन्हा घडला त्यावेळी संभाजी भिडे हे सांगली जिल्ह्यात उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात कोणतेही दोषारोपपत्र दाखल करण्यात आले नाही. अशी माहिती ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात दिली आहे.
– अ‍ॅड. पुष्कर दुर्गे, संभाजी भिडे

हेही वाचा  

नंदुरबार : शहादा नगरपालिकेतील प्रशासकराज संपणार का ?

बीड : पैसे देत नसल्याने आईच्या मदतीने मुलाने केला वडिलांचा खून

Arya Taware : बारामतीच्या आर्याने पटकावले ‘फोर्ब्ज’च्या यादीत स्थान

Back to top button