बीड : पैसे देत नसल्याने आईच्या मदतीने मुलाने केला वडिलांचा खून | पुढारी

बीड : पैसे देत नसल्याने आईच्या मदतीने मुलाने केला वडिलांचा खून

केज : पुढारी वृत्तसेवा : पैशाच्या कारणावरून वडिलांच्या डोक्यात पेरणी करण्याच्या तिफनीचा फण घालून गंभीर जखमी केले. यात वडिलांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या प्रकरणी मुलगा आणि आईवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

याबाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील विडा,बेंगळवाडी येथे २३ एप्रिल रोजी दुपारी ४ च्या सुमारास रमेश सोनाजी शिंदे यांना त्यांचा मुलगा ऋषिकेश शिंदे आणि पत्नी हिराबाई शिंदे यांनी घर खर्चासाठी पैसे मागितले. परंतु रमेशने त्यांना पैसे नसल्याचे सांगितले. त्यामुळे ऋषिकेश व हिराबाई यांना त्याचा राग आला. रागाच्या भरात ऋषिकेशने अंगणात पडलेला तिफणीचा फण उचलून दोन्ही हाताने रमेश याच्या डोक्यात मारला. त्यामुळे रमेश यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याने ते खाली पडले. यावेळी रमेशचा भाऊ बाबुराव शिंदे मध्ये पडला असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. तसेच रमेशला पुन्हा मारण्यासाठी ऋषिकेशला त्याच्या आईने प्रवृत्त केले.

दरम्यान, जखमी रमेशला त्यांचा भाऊ बाबुराव शिंदे यांनी गावकऱ्यांच्या व नातेवाईकांच्या मदतीने नेकनूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. परंतु रमेश गंभीर जखमी झाल्याने डॉक्टरांनी प्रथमोपचार करून बीड येथील सरकारी दवाखान्यात पाठविले. येथील जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी रमेशची तपासणी केली असता त्याला पुणे येथे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर २४ एप्रिल रोजी पुणे येथील ससून रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना २ मेरोजी दुपारी ४ च्या सुमारास मृत्यू झाला.

या प्रकरणी रमेश याचा भाऊ बाबुराव शिंदे याच्या फिर्यादीवरून रमेशचा मुलगा ऋषिकेश आणि पत्नी हिराबाई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक उमेश आघाव आणि बाळराजे सोनवणे यांनी दोन्ही आरोपींना अटक करून केज न्यायालयासमोर हजर केले असता त्या दोघांना ७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि संतोष गित्ते करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button