पिंपरी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: अस्तित्वात नसलेल्या कंपनीचे बनावट नियुक्तीपत्र देऊन सतरा जणांना नोकरीचे आमिष दाखवले. त्यानंतर त्यांची 24 लाखांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी पाच जणांना गुन्हे शाखा युनिट क्रमांक चारच्या पथकाने अटक केली. महेशकुमार कोळी (रा. स्पाइन रोड, भोसरी), सूरज महाले (रा. चंदननगर, पुणे), श्रावण शिंदे, अनुदीप शर्मा पशुपती, आणि एक महिला अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी कमलेश पंढरीनाथ गंगावणे (40, रा. तापकीरनगर, काळेवाडी) यांनी सोमवारी (दि. 26) भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून टेक्नालॉजी एस.ए.पी, एमएम कंपनी व एम. के. मॅनेजमेंट सर्व्हिस कंपनी नावाने नोकरीची जाहिरात दिली. आरोपी कोळी हा कंपनीचा जाहिरात देणार्या कंपनीचा मालक आहे. आरोपी व इतर साथीदारांनी फिर्यादी व त्यांच्यासोबत असलेल्या इतर 16 जणांना ई पॅवेलिन कंपनी (खराडी), बॅक्यू सॉफ्टवेअर सिस्टीम प्रा. लि. कंपनी (विमाननगर) येथील बनावट कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फिर्यादी गंगावणे यांच्याकडून एक लाख 65 हजार रुपये घेतले. तसेच, इतर 16 सहकार्यांकडून 22 लाख 58 हजार असे एकूण 24 लाख 26 हजार रुपये, ऑनलाइन तसेच धनादेशाद्वारे घेतले. तसेच, अस्तित्वात नसलेल्या बनावट कंपनीचे नियुक्तीपत्र देऊन आर्थिक फसवणूक व विश्वासघात केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तपास भोसरी पोलिस करीत आहेत.
हेही वाचा: