बारामती : जराडवाडीतील घरफोडीचा लागला छडा | पुढारी

बारामती : जराडवाडीतील घरफोडीचा लागला छडा

बारामती; पुढारी वृत्तसेवा : जराडवाडी (ता. बारामती) येथे १४ एप्रिल रोजी झालेल्या घरफोडीचा बारामती तालुका पोलिसांनी छडा लावला आहे. चोर पकडताना पोलिसांनी गुन्ह्यातील मुद्देमालही हस्तगत केला आहे. चोरट्यांकडून पोलिसांनी तब्बल ४ लाख ९६ हजारांचे दागिने हस्तगत केले आहेत.

सोमनाथ उर्फ सोन्या तात्या काळे (वय २२, रा. नांदगाव, ता. कर्जत, जि. नगर) याच्यासह रावी खुर्द (ता. आष्टी, जि. बीड) येथील एका अल्पवयीन युवकाला पोलिसांनी याप्रकरणी अटक केली आहे.

याबबातची सविस्तर माहिती अशी की, जराडवाडीतील नवनाथ पंढरीनाथ जराड यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी ४ लाख ९६ हजारांचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. चोरीच्या घटनेनंतर पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी चोरीचा छडा लावण्यासाठी मोहिम हाती घेतली होती. त्यानुसार सपोनि योगेश लंगुटे, हवालदार राम कानगुडे, पोलिस नाईक अमोल नरुटे, रणजित मुळीक, प्रशांत राऊत, सदाशिव बंडगर आदींचे पथक कार्यरत होते.

या घटनेचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणातून नांदगाव येथून सोन्या तात्या काळे याला ताब्यात घेतले. या प्रकरणात एका अल्पवयीन युवकाचा समावेश असल्याचे दिसून आल्यानंतर त्यालाही अटक करण्यात आली. चोरट्यांकडून चोरी केलेले ४ लाख ९६ हजारांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button