

शंकर कवडे
पुणे : बंगळुरू येथील व्यापार्यांनी आपला मोर्चा पुण्यातील बाजारपेठेकडे वळविला आहे. बाजारात बंगळुरू येथून मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या निशिगंध फुलांना प्रतिकिलोला 80 ते 150 रुपये भाव मिळत आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील फुलबाजारात यवतसह बंगळुरू व नांदेड परिसरातून निशिगंध दाखल होत आहे. मागील दोन वर्षे कोरोनामुळे सण, उत्सवावर मर्यादा तसेच मंदिरे बंद असल्याने ही परिस्थिती कधीपर्यंत राहील, याची शाश्वती नव्हती. त्यामुळे बहुतांश शेतकर्यांनी लागवडीकडे पाठ फिरविल्याने निशिगंधच्या उत्पादनात घट झाली. परिणामी, बाजारातील आवक रोडावून निशिगंधचे भाव वधारले आहेत. बंगळुरूच्या बाजारपेठांमध्येही निशिगंधचे दर कमी मिळत असल्याने येथील व्यापार्यांनी शहरातील बाजारपेठांमध्ये फुले पाठविण्यास सुरुवात केली आहे. बाजारात बंगळुरूच्या निशिगंधच्या प्रतिकिलोला 80 ते 150 रुपये, तर यवतच्या निशिगंधला 150 ते 300 रुपये भाव मिळत आहे.
स्थानिक भागातील शेतकरी सकाळी फुलांची तोड करून ती बाजारपेठेत विक्रीसाठी आणतात, तर बंगळुरूची निशिगंध फुले दोन दिवसांनंतर बाजारात येतात. यवत येथून येणारी निशिगंध ही कळी स्वरूपात असते, तर बंगळुरू येथून निशिगंध दाखल होईपर्यंत ती उमलते. त्यामुळे बंगळुरूच्या तुलनेत यवतच्या निशिगंधला अधिक भाव मिळतो.
आकार, दर्जा, सुगंधानुसार दोन्हीकडील निशिगंध सारख्याच दिसतात. मात्र, फुललेली निशिगंध ही एक दिवस, तर कळी दोन दिवसांपर्यंत राहत असल्याने हारविक्रेते स्थानिक निशिगंधची खरेदी करण्यास प्राधान्य देतात.
निशिगंध महाग झाल्यानंतर पर्याय म्हणून जांभळी, सोरतापवाडी, फुरसुंगी, यवत व पुरंदर परिसरातून येणार्या बिजलीच्या फुलांचा वापर हार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. मात्र, सध्या बिजलीची आवकही निम्म्यावर आली असून, त्यांचे दरही जास्त आहेत. एरवी प्रतिकिलो 100 ते 150 रुपयांना विकली जाणारी बिजली प्रतिकिलो 200 रुपयांवर पोहचली आहे. बिजलीपेक्षा निशिगंध अधिक टिकाऊ तसेच भरगच्च दिसत असल्याने निशिगंधची खरेदी करण्याकडेच हार विक्रेत्यांचा कल असल्याचे चित्र आहे.
निशिगंधची लागवड केल्यानंतर उत्पादन हाती येण्यास चार ते पाच महिने लागतात. त्यानंतर तीन वर्षे उत्पादन मिळत राहते. एरवी फुलबाजारात निशिगंधला सरासरी शंभर रुपये प्रतिकिलो भाव मिळतो. मात्र, यंदा कोरोनामुळे लागवड कमी झाल्याने निशिगंधच्या भावात मोठी वाढ झाली आहे.
– अरुण वीर, अध्यक्ष, अखिल पुणे फुलबाजार अडते असोसिएशन