

पुणे, पुढारी वृत्तसेवा: हनुमान जयंतीनिमित्त कर्तव्यावर असताना चाललेली भांडणे पाहून मध्यस्थी करणार्या पोलिस कर्मचार्याच्या हाताचा एकाने चावा घेतल्याचा प्रकार विश्रांतवाडी येथील एकतानगर येथे घडला. याप्रकरणी चावा घेणार्याला विश्रांतवाडी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बेड्या ठोकल्या आहेत. बाजीराव बाळू सुकळे (वय 33, रा. कर्वेनगर, कोथरूड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलिस अंमलदार प्रीतम जंगम यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हनुमान जन्मोत्सवानिमित्त जंगम विश्रांतवाडी येथील एकतानगर येथे कर्तव्यावर हजर असताना त्यांना बाजीराव सुकळे आणि बजरंग दगडे यांच्यामध्ये भांडण व मारामारी सुरू असल्याचे दिसले. जंगम तत्काळ दोघांची भांडणे सोडविण्यासाठी धावले. ते त्यांचे काम करीत असताना भांडणे सोडविल्याच्या रागातून सुकळे हा त्यांच्या अंगावर धावून गेला. त्यानंतर त्याने त्यांच्या हाताचा जबर चावा घेतला. त्यानंतर त्यांना जखमी केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक एस. एस. माळी करीत आहेत.
हेही वाचा: