‘ड’ जीवनसत्त्वाअभावी मुलांमध्ये वाढला ‘मुडदूस’

File photo
File photo
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

नऊ वर्षांचा संदीप (नाव बदलले) हा गेल्या काही दिवसांपासून स्नायू आणि सांधेदुखीने त्रस्त होता. त्याचे गुडघे आतील बाजूला वाकले होते आणि चालताना घोटेही वेगळे होत होते. संदीपच्या पायांमध्ये अचानक झालेल्या या बदलामुळे त्याच्या आई-वडिलांनी त्याला अस्थिरोगतज्ज्ञांकडे नेले. डॉक्टरांनी त्याला 'मुडदूस' असल्याचे निदान केले व सहा महिन्यांच्या उपचारानंतर तो पूर्वीसारखा ठणठणीत झाला.

कोरनामुळे मुले घरात बंद राहिल्याने वाढली समस्या

कोरोनामुळे शाळा बंद असल्याने सुमारे दोन वर्षांपेक्षा अधिक काळ मुलांचे शिक्षण घरूनच सुरू होते. यामुळे लहानग्यांचे घराबाहेर बाहेर पडणे बंद झाले आणि घरच्यांनीही त्यांना बाहेर जाऊ दिले नाही. त्यामुळे ऊनही मिळाले नाही. या व इतर कारणांमुळे त्यांच्यामध्ये हाडांच्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. तर काहींना मुडदूससारख्या रोगाचीही लागण झाल्याचे दिसून आले आहे.

शहरातील बालअस्थिरोग तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार गेल्या दीड-दोन वर्षांपासून मुडदूसग्रस्त (रिकेट्स) मुलांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सन 2020 पासून लॉकडाऊन आणि साथीच्या रोगामुळे, मुले उन्हात बाहेर पडली नाहीत आणि 'ड' जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे आणि शारीरिक व्यायामाच्या अभावामुळे अनेकांच्या हाडांमध्ये विकृती निर्माण झाली आहे.

केवळ आर्थिक परिस्थिती नसल्याने पोषणमूल्य शरीरात कमी जाऊन हा आजार झाला असे नाही, तर आर्थिक परिस्थिती चांगली असलेल्या कुटुंबातील मुलांनाही या आजाराने ग्रासले आहे. लॉकडाऊनच्या काळात कोरोनाच्या भीतीने या मुलांना घराबाहेर खेळण्यापासून रोखले जात होते. त्यामुळे कोवळ्या उन्हाच्या अभावामुळे मुलांना हा आजार झाल्याचे निरीक्षण बाल अस्थिरोगतज्ज्ञांनी नोंदविले आहे.

काय आहे मुडदूस?

मुडदूस म्हणजे मुलांमध्ये हाडे मऊ, कमकुवत होणे. सामान्यतः दीर्घकाळापर्यंत 'ड' जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे हे होते. 'ड' जीवनसत्त्व हे शरीराला अन्नातून कॅल्शियम आणि फॉस्फरस शोषण्यास मदत करते.

लॉकडाऊनच्या आधी आम्हाला एका महिन्यात 5 ते 6 केसेस दिसायच्या, आता आम्ही महिन्यातून 30 ते 35 अशा केसेस पाहत आहोत. हाडे दुखणे आणि पायाची विकृती ही नेहमीची लक्षणे आहेत. आहारातही कॅल्शियमयुक्त आहाराचा अभाव असल्याने हे दिसून येते. त्यामुळे त्याच्यामध्ये मुडदूसची लक्षणे दिसत होती. अशा प्रकारात शस्त्रक्रियेची आवश्यकता असते. परंतु, काही उपचारांनी ते बरे होऊ शकतात.

                                        – डॉ. संदीप पटवर्धन, संचेती रुग्णालय, बाल अस्थिरोगतज्ज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news