औरंगाबाद : हिरव्यागार सोयाबीनमध्ये सोडल्या मेंढ्या, उत्पन्नासह हंगामही गेला | पुढारी

औरंगाबाद : हिरव्यागार सोयाबीनमध्ये सोडल्या मेंढ्या, उत्पन्नासह हंगामही गेला

कन्नड पुढारी वृत्तसेवा : खरीप हंगामातील सोयाबीन पिकाला चांगला भाव मिळाला म्हणून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात सुद्धा मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली. मात्र उन्हामुळे फुल गळती झाल्याने शेंगाच आल्या नसल्याने सोयाबीनचे पीक धोक्यात आले आहे., दरम्यान तालुक्यातील हतनूर येथील शेतकरी श्रीराम उर्फ मुकुंद काळे या शेतकऱ्याने दोन एकर मधील उभ्या हिरव्यागार सोयाबीन पिकात चरण्यासाठी मेंढ्या बकऱ्यांना सोडून दिल्या.

सोयाबीनचे संपूर्ण पीक वाया गेले

तालुक्यात यावर्षी जास्तीचा पाऊस झाला. त्‍यामुळे  बागायती शेतीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.खाद्यतेलाचे भाव वाढल्याने सूर्यफूल, सोयाबीन, कापूस, इत्यादी तेलबिया पिकांना चांगला भाव मिळाला होता. तालुक्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात सूर्यफूलासह सोयाबीन या पिकांकडे लक्ष केंद्रित केले. महागडी बियाणे खरेदी करून तालुक्यात १३२८ हेक्टर म्हणजे ३ हजार ३२० एकरवर सोयाबीनची पेरणी केली होती. सुरुवातीला ढगाळ वातावरण राहिल्याने कीटक व बुरशीनाशक प्रतिबंध म्हणून औषध फवारणी करावी लागली होती. त्यानंतर सोयाबीन चांगले बहरले मात्र ऐन फुल धारण करण्याच्या आवस्थेत उन्हाचा तडाखा वाढल्याने संपूर्ण फुलगळ झाली. त्यामुळे झाडांना शेंगाच आल्या नसल्याने सोयाबीनचे संपूर्ण पीक वाया गेले.

तालुका कृषी विभागाशी संपर्क केला असता जास्त उष्ण वातावरणामुळे फुल गळती झाल्याने सोयाबीनचे उत्पन्न येऊ शकले नाही. उन्हाळी सोयाबीन लागवडीची शिफारस विद्यापीठाची नव्हती, अशी माहिती देण्यात आली. दरम्यान तालुक्यातील हतनूर येथील शेतकरी श्रीराम उर्फ मुकुंद काळे या शेतकऱ्याने दोन एकर मधील उभ्या हिरव्यागार सोयाबीन पिकात चरण्यासाठी मेंढ्या बकऱ्यांना सोडून दिल्या.

उन्हाळी सोयाबीन लागवडी करिता कृषि विद्यापीठाची शिफारस नव्हती; मग कृषी सेवा केंद्रात सोयाबीनचे बियाणे उपलब्ध झालेच कसे? जर कृषी केंद्रात बियाणे उपलब्ध झाले नसते तर शेतकऱ्यानी पर्यायी इतर पिकांची लागवड केली असती कृषी केंद्र चालक बियाणे विकून मोकळे झाले मात्र शेतकऱ्याचा उत्पन्न सहहंगाम वाया गेल्याने नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.

प्रतिक्रिया :

तालुक्यात जास्त उष्णतेमुळे सोयाबीन ची फुल गळती झालेली आसल्याने त्यामुळे शेंगा आलेल्या नाहीत तसेच उन्हाळी सोयाबीन लागवडीची विद्यापीठाची शिफारस नाही.
-बाळराजे मुळीक तालुका कृषी अधिकारी

दोन एकरमध्ये सोयाबीन ची लागवड केली होती यासाठी शेती मशागत, बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशक फवारणी असा एकूण वीस ते पंचवीस हजार इतका खर्च आला होता. मात्र आता सोयाबीनला शेंगाच  आल्‍या नाहीत त्‍यामुळे उत्पन्न तर सोडाच झालेला खर्च व हंगाम वाया गेला आहे.
-मुकुंद काळे शेतकरी, हतनूर

हेही वाचा

Back to top button