पिंपरी : बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयास सुटीच्या हंगामात टाळे

Pimpri: Avoid Bahinabai Chaudhary Zoo during the holiday season
Pimpri: Avoid Bahinabai Chaudhary Zoo during the holiday season

पिंपरी : मिलिंद कांबळे : कोरोना महामारीचे संकट दूर झाल्याने शहरातील सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. तसेच, सुटीच्या हंगाम सुरू झाला आहे.

असे असताना महापालिकेच्या संभाजीनगर, चिंचवड येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान व प्राणिसंग्रहालयास टाळे कायम आहे.

कासव गती कामामुळे प्रकल्प पूर्ण होण्यास आणखी 3 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. शहरातील एकमेव प्राणिसंग्रहालय पर्यटनासाठी बंद असल्याने महापालिकेच्या भोंगळ कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

लोकवस्तीमध्ये एमआयडीसीच्या 7 एकर जागेत सर्पोद्यान आहे. तेथे छोट्या आकाराचे प्राणिसंग्रहालयास सुरू करण्यास केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने महापालिकेस मान्यता दिली आहे. पालिकेने काम सुरू केले.

कामाची मुदत ऑक्टोबर 2018 पर्यंत होती. मात्र, कासव गती कामामुळे एप्रिल 2022 सुरू झाले तरी, अद्याप कामे अपूर्ण स्थितीत आहेत. आतापर्यंत 80 ते 85 टक्के काम झाले आहे. कामास गती न देता उलट, ठेकेदाराला मुदतवाढ देण्याचा सपाटा पालिकेने लावला आहे.

परिसरात राडारोडा व ढिगारे कायम आहेत. फुलपाखरू कक्षाचे कामच सुरू झालेले नाही. सर्प कक्षातील विद्युत प्रकाश व्यवस्थेचे काम सुरू आहे. परिसरात हिरवळ व झाडे लावणे बाकी आहे. ड्रेनेजची कामे अपूर्ण आहे. पदपथ दुरूस्ती शिल्लक आहे. तसेच, अंतिम टप्प्यातील रंगरंगोटी होणे बाकी आहे.

परिणामी, गेल्या 5 पेक्षा अधिक वर्षांपासून प्राणिसंग्रहालयास टाळे असल्याने नागरिकांना सर्प, प्राणी व पक्षी दर्शन बंद आहे. पर्यटनाअभावी पालिकेचे लाखोंचे उत्पन्न बुडत आहे. असे असले तरी, 188 सर्प, प्राणी व पक्षी सांभाळणे तसेच, स्वच्छता व सुरक्षेसाठीचा खर्च कायम आहे.

नूतनीकरणावर 20 कोटींचा खर्च

पहिल्या टप्प्यात तब्बल 14 कोटींचे स्थापत्यविषयक कामे करण्यात आली. प्रशासकीय इमारत, स्टोअरेज रूम व स्टाफ क्वॉर्टर, सरपटणारे प्राणी, पक्षी, मगर व सुसर आणि कासव यांच्यासाठी स्वतंत्र 4 कक्षाची निर्मिती, अंतर्गत पादचारी मार्ग, स्वच्छतागृह या कामांचा समावेश आहे.

ते काम डिसेंबर 2017 ला पूर्ण झाले. दुसर्‍या टप्प्याच्या कामांचा खर्च 5 कोटी 82 लाख आहे. प्राण्यांच्या सुरक्षेसह, सुशोभीकरणाचे काम आहे. मुदत संपूनही ती कामे सुरू आहेत.

शहरवासीय पर्यटनापासून वंचित

पिंपरी-चिंचवड शहरातील हे एकमेव सर्पोद्यान व प्राणीसंग्रहालयास नवे रूप दिले जात आहे. त्यामुळे ते शहराचे वैभव ठरणार आहे. त्यामुळे शहराच्या नावलौकीकात भर पडणार आहे.

मात्र, प्राणीसंग्रहालयास टाळे असल्याने शहरवासीय पर्यटनापासून वंचित आहेत. नागरिकांना नाईलास्तव पुण्यातील कात्रज प्राणिसंग्रहालयात जावे लागत आहे. प्राणिसंग्रहालयाच्या जवळपास सायन्स पार्क, तारांगण, ऑटो क्लस्टर, बर्ड व्हॅली ही प्रेक्षणीय स्थळे आहेत.

तीन महिन्यात प्राणिसंग्रहालय खुले करण्याचे नियोजन

सर्पोद्यान व प्राणिसंग्रहायलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. प्रतिसाद देत नसल्याने सल्लागार बदलण्यात आला. एक डॉक्टर सोडून गेला आहे. मानधनावर आवश्यक संख्येने मनुष्यबळ नियुक्त केले जाणार आहे.

उर्वरित कामे येत्या 3 महिन्यात पूर्ण करून प्राणिसंग्रहालय नागरिकांसाठी खुले केले जाईल, असे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.

188 प्राणी, पक्षी

प्राणिसंग्रहालयात विविध जातीचे विषारी व बिनविषारी 55 साप आहेत. तर, 2 मगरी व 50 कासव आहेत. दोन मोर, 15 पोपट, 37 कॉकपिट, 27 लव्हबर्ड, 1 बदक आहे. असे एकूण 188 साप, पक्षी व सरपटणारे प्राणी आहेत. त्यांची देखभाल घेण्यासाठी 2 मजूर, मानधनावरील 2 अ‍ॅनिमल किपर व मानधनावरील 1 अ‍ॅनिमल क्युरेटर आहे.

तिकीट दर वाढविणार

कात्रजच्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयासाठी 40 रुपये तिकीट आहे. त्यांच्या 80 टक्के तिकीट आकारण्याचे नियोजन आहे. त्यानुसार एका व्यक्तीस 30 रुपये तिकीटाचा दर असणार आहे. आयुक्तांशी चर्चा करून तिकीट दर निश्चित केला जाणार आहे. पूर्वी 5 रुपये तिकीट होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news