चित्रा वाघ : ‘प्रचारसभेच्या ठिकाणी दगडफेक करण्यामागे कोण ? हे उघड करा’ | पुढारी

चित्रा वाघ : 'प्रचारसभेच्या ठिकाणी दगडफेक करण्यामागे कोण ? हे उघड करा'

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारसभेत दगडफेक करणाऱ्या संशयितांचा शोध घेऊन या घटनेमागे कोणाचा सहभाग आहे, हे उघड करा, अशी मागणी भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आज (सोमवार) पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे केली.

रविवार रात्री मुक्त सैनिक वसाहत परिसरात भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ चित्रा वाघ यांची सभा आयोजित करण्यात आली होती. ही सभा सुरु असताना व्यासपीठाच्या मागील बाजूस दोन अनोळखी तरुणांनी व्यासपीठाच्या दिशेने दगडफेक केली होती. या घटनेवर चित्रा वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. आज सकाळी शिष्टमंडळासमवेत वाघ यांनी पोलीस अधीक्षक बलकवडे यांची भेट घेऊन चर्चा केली.

पोटनिवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी कायदा-सुव्यवस्थेला कोठेही गालबोट लागू नये, यासाठी खबरदारी घेतलेली असताना काही समाजकंटकांनी भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेत दगडफेक करून दहशत निर्माण करणे, कितपत योग्य आहे. ही घटना गंभीर आहे. पोलीस यंत्रणांनी समाजकंटकांचा शोध घ्यावा, गृह राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात घडलेली घटना चिंता व्यक्त करणारी आहे. दगडफेकीच्या घटनेमागे नेमके कोण आहेत, याचा उलगडा होणे गरजेचे आहे. त्यासाठी भाजपा महिला आघाडीचा आग्रह राहणार आहे, असे त्या म्हणाल्या.

पोलीस अधीक्षक बलकवडे म्हणाले की, सभा सुरू असताना दोन अनोळखी तरुणांनी दगडफेक केली. पोलिसांनी तत्काळ दोन ओळखींचा पाठलाग केला पण अंधाराच्या दिशेने दोघे पळून गेले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे संशयितांचा शोध घेण्यात येत आहे. पोटनिवडणूक काळात कायदा-सुव्यवस्था अबाधित असून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. याची पूर्णपणे दक्षता घेण्यात आली आहे. प्रभारी अधिकाऱ्यांना याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. दगडफेकीच्या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधितांचा छडा लावण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button