धुळे पुढारी वृत्तसेवा : इंधन दरवाढ आणि महागाईच्या विरोधात आज धुळे जिल्हा काँग्रेस आक्रमक झाली. जेल रोडवर जिल्हा काँग्रेसने धरणे आंदोलन करीत केंद्र सरकारवर कठोर शब्दात टीका केली. निवडणुकीच्या काळात आश्वासनांची खैरात देणाऱ्या केंद्र सरकारला इंधन दरवाढ रोखण्यात अपयश येत असून या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा यावेळी आमदार कुणाल पाटील यांनी दिला.
धुळे जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून झालेल्या आजच्या आंदोलनामध्ये माजी मंत्री रोहिदास पाटील, काँग्रेसच्या जिल्ह्याच्या प्रभारी तथा राज्याच्या माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्छाव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, माजी आमदार शरद पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य गुलाबराव कोतेकर, मुकुंदराव कोळवले यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
यावेळी केंद्र सरकारवर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कठोर शब्दात टीका करण्यात आली. देशात महागाईचा भडका उडाला असून दररोज इंधनाचे दर वाढत आहे. देशात पाच राज्यांमध्ये निवडणुका सुरू होत्या. त्याचवेळी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी निवडणुकीनंतर इंधनाच्या दराचा भडका होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. या अंदाजानुसार आता इंधनाचे दर सातत्याने वाढत आहे. केंद्रातील भारतीय जनता पार्टीचे सरकार हे जनतेला महागाईने त्रस्त करीत आहेत. निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनांचा त्यांना विसर पडला असून जनता आता महागाईने त्रस्त झाली आहे.
या सर्व महागाईने त्रस्त झालेली ही जनता आता देशपातळीवर आंदोलनाच्या तयारीत असून मुंबई येथे काँग्रेसच्या माध्यमातून मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. त्याच प्रमाणे महागाईच्या माध्यमातून जनतेला त्रास देणाऱ्या केंद्र शासनाला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.