

सुवर्णा चव्हाण
पुणे : आगाज म्युझिक बँडमधील ते कलाकार कट्ट्यावर भेटतात अन् मग सुरू होतो अनोखा म्युझिक कॉन्सर्ट… कोणी गिटारची धून छेडतो, तर कोणी गाणे म्हणतो… हळूहळू भोवताली तरुणाईची गर्दी जमते अन् गाणी म्हणत ते त्यांना चिअरअप करतात… अक्षरश: काही जण तर गिटार घेऊन त्यांच्यासोबत परफॉर्मही करतात… यातून संगीतमय वातावरण रंगते अन् तरुणाईचा सळसळता उत्साह पाहायला मिळतो.
आगाज म्युझिक बँडने तरुणाईला वेड लावले असून, कलाकारांच्या कलाकारीला नवा आयामही मिळाला आहे.फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील कलाकार कट्ट्यावर कोणी चित्रातून, तर कोणी आपल्या वादनातून, गायनातून रसिकांची मने जिंकतोय. थेट कट्ट्यावर येऊन कलाकार सादरीकरण करू लागले असून, त्यात या म्युझिक बँडमधील तरुण कलाकारांचाही समावेश आहे. या बँडमधील नौंमन चौहान, वरुण शर्मा, आशिष भिंगारदिवे, नितीन यादव आणि अविनाश पांडे हे सर्वजण कलाकार कट्ट्यावर दर मंगळवारी सादरीकरण करीत असून, रेट्रो गीतांसह हिंदी चित्रपटांतील गाणी ते सादर करून रसिकांची दाद मिळवीत आहेत.
सायंकाळच्या वेळी कट्ट्यावर त्यांचे स्ट्रीट जॅमिंग रंगते अन् त्यांच्या सादरीकरणात तरुणाईही उत्साहाने सहभागी होते. कोणी त्यांच्यात मिसळून गिटार वादन करतात, तर कोणी गाणीही म्हणतात. प्रत्येक जण सहभाग घेतो अन् वेगळाच माहोल रंगतो. ते कोणाकडूनही पैसे घेत नाहीत, तर फक्त सर्वांना संगीताचा आस्वाद घेता यावा, हा त्यांचा उपक्रम आहे.
मला संगीताची आवड असून, मी गिटार वाजवतो आणि गाणेही गातो. आमच्या म्युझिक बँडमधील सर्वांची ओळख एका कॅफेत झाली. सर्वांनी काही दिवसांपूर्वीच आगाज म्युझिक बँडची सुरुवात केली. आम्ही कलाकार कट्ट्यावर सादरीकरण करीत असून, खासकरून तरुणाईचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रसिकांकडून फर्माईशही येतात. लाइव्ह ऑडियन्ससमोर कला सादर करताना अनुभव भन्नाट असतो.
– नौमन चौहान