पुणे : २५ गुंठे क्षेत्रामध्ये १०० कालवडींचे पालन, पूरक व्‍यवसाय शेतकर्‍यांसाठी ठरणार फायद्याचा

daund news
daund news

पाटस: अक्षय देवडे

कुसेगाव (ता. दौंड) येथील शेतकरी रमेश माणिकराव भोसले व त्यांचे बंधू धनंजय यांनी २५ गुंठे क्षेत्रामध्ये १०० कालवडींचे पालन केले आहे. दर १८ महिन्यांनी त्यांना यातून ४० लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. शेतीला जोडधंदा म्हणून कालवडपालनाचा हा यशस्वी प्रयोग शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरणार आहे.

२५ गुंठ्यांत शेडचे नियोजन

शेडची लांबी २५० फूट व रुंदी १०० फूट असून या शेडमध्ये सहा महिने, एक वर्ष, दीड वर्ष, दोन वर्षांत लागवडीला येणारी व लागवड झालेल्या कालवडींचे सहा गटांत विभाजन केले आहे. या प्रत्येक गटात जनावरांना एका बाजूला खाण्याची, दुसऱ्या बाजूस पिण्याच्या पाण्याच्या टाकीची व्यवस्था केलेली आहे.

काेराेना काळात खरेदी केल्‍या कालवडी

कोरोना काळात दुग्ध व्यवसाय कमी पडल्याने शेतकऱ्यांनी जनावरे विक्रीस काढली असताना सहा ते चोवीस महिने झालेल्या कालवडी प्रत्येकी दोन ते पंधरा हजार रुपये या किंमतीत भोसले यांनी खरेदी केल्या आहेत.

चाऱ्याची व्यवस्था

या कालवडींच्या चाऱ्यासाठी सात एकर क्षेत्रात ऊस, पायोनेर गवत, मका हे पीक घेतले आहे, तर महत्त्वाचा चारा म्हणून मुरघास दिला जातो.

मुक्‍तसंचार गोठ्यामुळे फायदे

मुक्तसंचार गोठ्यामुळे कालवडींना गोचीड, कासेचा आजार, रोगराई होत नाही, चारापाणी त्यांच्या आवश्यकतेनुसार मिळते, आरोग्यावर परिणाम होत नाही, मोकळ्या राहिल्याने आरोग्य चांगले राहते तसेच कामगारांचे काम कमी होते, प्रत्येक गायीवर लक्ष देणे सोयीचे होते, गाय आजारी पडली तर लगेच लक्षात येते.

जनावरांना टॅगची सिस्टिम,एका वर्षात उत्पादन सुरू

कोणती गाय आजारी आहे, लागवड झालेली आहे, लागवडीस आलेली आहे याची माहिती ओळखण्यासाठी टॅगचा उपयोग होत आहे. प्रत्येकी एका जनावराला विक्रीकरेपर्यंत २० हजार रुपये खर्च येत आहे. एका वर्षात लागवडी पूर्ण झालेल्या दहा गायी विक्रीला असून प्रत्येकी ९५ हजार रुपयांना विक्री केली जाणार आहे.

शेणखताचे उत्पादन

तीन महिन्यांना शेण गोळा करावे लागत असल्याने १२ टेलर शेणखत जमा होत आहे. वर्षाला ५० टेलर खत मिळते. खताचा १ टेलर ६ हजार रुपये किमतीने शेतकरी घेऊन जात आहे. शेतीला शेणखत वापरल्याने इतर खते वापरण्याचा खर्च कमी होत आहे. दूध दर वाढल्याने प्रत्येक गायीची किंमत एक लाखाच्या आसपास मिळणार असल्याने पुन्हा कालवड पालनातून जास्तीचे उत्पादन मिळणार, हे निश्चित आहे. शेतकऱ्यांनी कालवडपालन करून चांगल्या प्रतीची गाय तयार करून शेतीला जोडधंदा करून शेतकऱ्यांना उत्पादन मिळवता येईल, अशी माहिती रमेश भोसले यांनी दिली.

राजकारण ते शेती

शेतकरी कुटुंबातून आलेल्या रमेश भोसले यांनी दौंड बाजार समितीचे सभापती ते गावच्या सरपंचपदाचा कारभार पाहिला आहे. बालपणापासून कष्ट, ध्येय आणि चिकाटीने उभा केलेला दुग्ध व्यवसाय सुरू करण्यापूर्वी पाहिलेले स्वप्न ते म्हणजे कालवड पालन करून लाखोंचे उत्पन्न घ्यायचे आणि इतर शेतकऱ्यांनाही प्रोत्साहित करणे, हे होते.

हेही वाचलं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news